आता अवघे काही तास विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला शिल्लक राहीले आहेत, प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी मतदान आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. 2019 नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले. अजित पवार गटानं त्यापैकी राष्ट्रवादीच्या भाजपला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती.
एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. दरम्यान या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवारांनी शेवटची सभा गाजवली, पण काकांवर थेट टीका टाळली
दरम्यान यावेळी सर्वच राजकीय पक्षांसमोर दुसरं मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्याची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं. मात्र अनेक ठिकणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातील बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. संजय क्षीरसागर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत वाढली आहे.