दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. (Delhi Government) या निवडणुकीआधीच सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कैलास गेहलोत यांनी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून निर्णयाची माहिती दिली आहे. मंत्रिपदाबरोबरच गेहलोत यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा का देत आहोत याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठे आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी या निर्णयाची माहिती लोकांना दिली आहे. पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधीच कैलास गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भर सभेत उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले….
आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी कैलास गेहलोत यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु, केजरीवाल यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केलं. ज्यावेळी केजरीवाल तुरुंगात होते त्यावेळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी उपराज्यपालांनी कैलास गेहलोत यांचीच निवड केली होती. आता गेहलोत यांनीच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी या निर्णयांमागील कारणांचा उहापोह केला आहे.