काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आज अमरावतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. पीएम मोदींची मेमरी (PM Narendra Modi) लॉस झाल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान होत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचा मेमरी लॉस झाला आहे. आम्ही जे बोलतो तेच मोदी बोलत असतात असे माझी बहीण मला सांगत असते. त्यांची अशी स्थिती पाहून मला अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आठवण येते. ते सुद्धा अनेकदा विसरायचे. तेव्हा त्यांच्या बरोबरील अधिकाऱ्यांना त्यांना आठवण करून द्यावी लागत असे. एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष अमेरिका दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून संबोधले होते चूक लक्षात येताच त्यांनी चुकीची दुरुस्ती केली. आता नरेंद्र मोदी देखील याच मार्गाने जात आहेत अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
शरद पवारांनी ‘वोट जिहाद’वरून फडणवीसांना झापलं
राज्याच्या निवडणुकीत मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर ठाकरे गटाने महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनीही आज आपल्या भाषणात या मुद्द्याचा उल्लेख करत सरकारला घेरलं. महाराष्ट्रात आधीचं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने कोट्यावधी रुपयांचा वापर केला. धारावीच्या जमिनीची किंमत एक लाख कोटी रुपये आहे. गरीबांच्या हातातील ही जमीन हिसकावून घेऊन अदानीला देण्याचा ह्या लोकांचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
25 अब्जाधीश आहेत. त्यांचे 16 लाख कोटी रुपये या सरकारने माफ केले आहेत. आम्ही तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. आता तब्बल एक लाख कोटी रुपये अदानीला दिले जाणार आहेत. पण हे शक्य होणार नाही कारण राहुल गांधी इथे उभा आहे, असं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं.