ओतूर,प्रतिनिधी:दि.१५ नोव्हेंबर ( रमेश तांबे )
पर्यटनवाढ ही कालांतराने गर्दीत रूपांतरीत होणारी प्रक्रीया बनते. (Otur) मात्र परिस्थितीकी संवर्धन गाभा ठेवून पर्यटनाची व्याप्ती वाढवणे ही पर्यावरणाच्या रक्षणाची खऱ्या अर्थाने हमी आहे.त्यामुळे जुन्नरच्या आदीवासी भागात संवर्धनातून पर्यटन ही संकल्पना रोजगाराचा समृद्ध स्त्रोत ठरेल असे प्रतिपादन जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले.
जुन्नर पश्चिमघाट सडे पठारे संवर्धन समितीची बैठक जुन्नर उपवनसंरक्षक कार्यालयात पार पडली.या बैठकीत ते बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी भवताल पर्यावरणपूरक चळवळीचे अभिजित घोरपडे, जर्मन दूतावासाच्या मॅक्सम्यूलर संस्थेच्या बीज कथा प्रकल्पाचे प्रवर्तक अभिजीत पाटील, मुंबई येथील सृष्टीज्ञान संस्थेच्या विश्वस्त केतकी फाटक, आदीवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प संचालक प्रदीप देसाई, सहाय्यक वनसंरक्षक स्मीता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समिती (गडकिल्ले पुरातत्व वारसा) सदस्य व सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे सचिव गणेश कोरे, ओम ट्रायबल फौंडेशनचे मिलींद मडके, वनस्पतीशात्र अभ्यासक आणि संवर्धक डॉ.संजय रहांगडले, डॉ.सविता रहांगडले, डॉ.विनायक लोखंडे,मिलिंद मडके, जुन्नर टुरीझम डेस्टीनेशनचे चेतन पारखे, महेश शेटे आदी या बैठकीत उपस्थित होते.
समितीच्या धोरणात्मक आखणीत पेसा गावातील जीवनमान उंचवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जुन्नर तालुक्यातील आंबे हातवीज, हिवरे पठार, सुकाळवेढे येथील पठारांच्या संवर्धनासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे.या समिती सदस्यांनी या भागात भेट देऊन पाहणी केली.
उपवनसंरक्षक श्री सातपुते पुढे म्हणाले की,‘‘या भागातील जैववैविधतेचे सर्वेक्षण झाले असून, त्याच्या संवर्धनासोबतच आदीवासींचे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थान करण्यासाठी प्रकल्प संहिता तयार करण्यात येत आहे. विविध विभागाच्या अधिकारी आणि पर्यावरण पूरक चळवळीत काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या शिवारफेरीच्या आयोजनातून ही संहिता पुढील महिन्यापर्यंत तयार होईल.
अभिजित घोरपडे म्हणाले की, ‘‘जुन्नर भागातील पठारे ही जैववैविधतेच्या दृष्टीने जगातील आगळी ओळख ठरणारी आहेत त्यामुळे येथील संवर्धन प्रक्रीयेचा प्राधान्यक्रम ठरवताना येथील परिस्थितीकी समजून घेऊनच पुढे जावे लागेल.
अभिजीत पाटील यांनी या भागातील संवर्धन प्रकल्पात स्थानिक युवकांना सामावून घेऊन, त्यातून त्यांना रोजगार मिळेल यासाठी प्राधान्यक्रम ठेवावा लागेल असे सांगितले. आदीवासी भागात पाण्याच्या कमतरतेची समस्या असल्याने शिवकालीन टाक्यांतून पाणीसाठ्यांचे नियोजन करावे असे नमूद केले.
प्रदीप देसाई म्हणाले की,‘‘संवर्धन गाभा ठरवून पुढे जाताना रानभाजी, काजवा महोत्सव या भागात करणे टाळले पाहीजे. रोजगार आणि पर्यावरणपूरक योजना आदीवासी प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबवता येतील त्यामध्ये मधमाशीपालना बरोबर भिमाशंकर स्ट्रॉबेरी क्लस्टरसारखे रानभाज्या लागवडीसाठीतून क्लस्टर उभारणीसाठी निधी प्रकल्पातून देता येईल.
डॉ.संजय रहांगडाळे यांनी सांगितले की,‘‘दुर्गवाडी भागात पर्यटनासाठी खूप मोठ्या संख्येने लोक येत आहेत.त्यामुळे गर्दीमुळे तेथील काही वनस्पतींना धोका निर्माण होत आहे. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. हे दुष्परिणाम रोखण्यासाठी सडे पठारे संवर्धन प्रकल्पातून पर्यटन नियंत्रणासोबतच येथील जैववैविध्य टिकविण्यासाठी काही विशेष उपाययोजना हाती घ्यावी लागेल.
स्वागत स्मिता राजहंस यांनी केले.प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.