राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती. परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही एका मुलाखतीत या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे सहाजिक आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते. महायुतीचं राजकारण वास्तविकतेवर आधारीत आहे. तेव्हा मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
8 लाखांचे गृहकर्ज अन् 4% व्याज सबसिडी, मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकारचा दिलासा
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमच्याबरोबर आले. त्यावेळी सुद्धा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री करा अशी कोणतीही अट ठेवलेली नव्हती. मात्र एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू हे आम्ही सुद्धा दाखवून दिलं. आम्हाला सत्तेची कोणतीही लालसा नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
जर आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला असता तर तो नक्कीच पाळला असता. पक्षाने घोषणा केली. प्रत्येक सभेत त्यांच्यासमोर सांगितलं होतं तरी देखील ते बदलत असतील तर मात्र हे बरोबर नाही. बिहारमध्ये आमच्या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या असतानाही आम्ही नितीशकुमार यांना (Nitish Kumar) मुख्यमंत्री केलं. त्यावेळी बिहारची जबाबदारी माझ्याकडे होती. तुमच्या जास्त जागा आल्या आहेत अशा वेळी मला मुख्यमंत्री होणं योग्य वाटत नाही असे नितीशकुमार मला म्हणाले होते. त्यावेळी मी त्यांना हा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाचा असल्याचं सांगितलं. नंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन (PM Narendra Modi) लावला. त्यांनीही आमचा निर्णय झाला असल्याचे नितीशकुमार यांना सांगितले.