सध्या महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. काय होणार या निवडणुकीत त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडणार आहे आणि निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट या निवडणुकीत सामना आहे. दरम्यान राज ठाकरेंनीही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. राज ठाकरे हे प्रचारसभांच्या दरम्यान सातत्याने शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, फोडाफोडी केली हे म्हणत आहेत .शरद पवार यांना याबाबत विचारलं असता ( Sharad Pawar ) राज ठाकरे मूर्खासारखं बोलतात म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.
जातीयवादाचा जोरदार राज ठाकरे माझ्यावर आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बुधवारी बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.
या सरकारला जागा दाखवून द्या; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल
राज ठाकरेंच्या आणखी एका आरोपला यावेळी शरद पवार यांनी उत्तर दिले. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना डोक्यावरील पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालायला लावली. राज ठाकरे यांनी हाच शरद पवार यांचा जातीयवाद आहे, असे म्हटले होते. शरद पवार यांनी त्याला उत्तर देताना आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, तो कार्यक्रम महात्मा फुले यांचा होता, त्यांच्या विचारांचा होता. त्या कार्यक्रमात मला स्वत:ला आणि इतर सगळ्यांना फुले पगडी घालण्यात आली. त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरुर बोललो की, माझ्या डोक्यावर फुले पगडी घातली, याचा मला आनंद आहे. पगडी हे काही जातीधर्माचं लक्षण नाही. त्यामुळे फुले पगडी वापरा आणि त्याचा आनंद आहे, अशाप्रकारचं वाक्य बोललं तर लगेच आपण जातीयवादी होतो? संपूर्ण जीवनात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन नेण्याचे काम केले. माझ्या वाचनात त्यांनी कधीही जातीवर आधारित वक्तव्य केल्याचे नाही. त्यामुळे महात्मा फुले आमच्यासाठी आदरणीय आहेत.