महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. अशातच अनेक दिवसांपासून (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून आज १२ नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घाटकोपर आणि कांदिवली येथे दौरा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता घाटकोपर येथील जनरल अरुणकुमार वैद्य या उद्यानात सभा होणार आहे तर कांदिवली मधील कमलास्पोर्ट्स क्लबमध्ये ही जाहीर सभा पार पडेल. अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शो देखील होणार असल्याने वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे.
“जेवीएलआर आणि एससीएलआर येथे १२ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळच्या नियोजित हालचालीमुळे, वाहनांची हालचाल संथ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे.” अशी माहिती मुंबई वाहतुक पोलिसांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन नागरिकांना दिली आहे. सायंकाळी कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल केल्याने आता नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित शाह हे मुंबई विमानतळावरुन जुहु ते सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) मार्गे घाटकोपरच्या दिशेने प्रवास करतील तर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून कांदिवलीच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे या मार्गादरम्यान, वाहतुक संथ गतीने होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा; वाहतुकीत मोठे बदल
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देखील वाहतुकीत बदल केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्याचबरोबर चेंगराचेंगरा झाल्याने अनेकांचे जीव धोक्यात देखील आले होते.मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल याची शक्यता आहे तर त्यावेळी झालेली स्थिती ही पुन्ही उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिस विभागाकडून अतिदक्षता घेण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा दुपारी १२ वाजता चिमूरमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता सोलापूर येथे मोदी भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील.त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पुण्यात मोदींचा रोड शो होईल, त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अकोला, अमरावती आणि नागपूर येथे भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.