ओतूर,प्रतिनिधी:दि.१० नोव्हेंबर ( रमेश तांबे )
जुन्नर (Otur) तालुक्यातील वाढती बिबट समस्या लक्षात घेता एकांतात असलेल्या घरांसाठी “सौर कुंपणाचा” वापर करण्यात येत असून,यासाठी जुन्नर वन विभागातील कांदळी नगदवाडी येथे उभारण्यात आलेल्या बेस कॅम्प मध्ये जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून वनपरिक्षेत्र जुन्नर,ओतूर परीक्षेत्रामधील अधिकारी व कर्मचारी तसेच बिबट रेस्क्यू टीम सदस्य यांना सौर कुंपणाबाबतच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जुन्नर तालुक्यातील वाढती बिबट समस्या लक्षात घेता ज्या ठिकाणी एकांतात घरे आहेत, तेथील माणसांना बिबट्यापासून सुरक्षित उपाय योजना म्हणून या सौर कुंपणाचा वापर करण्यात येत आहे. या सौर कुंपणामध्ये विशिष्ट क्षमतेचा इलेक्ट्रिक करंट सोडण्यात येत असून जर या तारेला प्राण्यांचा जर स्पर्श झाला तर जोरात झटका बसतो व त्या ठिकाणी पुन्हा ते प्राणी येत नाहीत. जुन्नर तालुक्यातील अशा एकांतात असलेल्या घराला हे सौर कुंपण बसवले गेले तर तेथील कुटुंब बिबट्यापासून सुरक्षित होणार आहे. ३० हजार किमतीचे हे उपकरण असुन यामध्ये ७५ टक्के सबसिडी येथील कुटुंबाला देण्यात येणार असून २५ टक्के रक्कम ही या कुटुंबाने भरवायची आहे. तसेच घराभोवती ठराविक अंतरावर खड्डे खोदून पोल लावण्याचे काम कुटुंबालाच करून घ्यावे लागणार आहे. याबाबत संपूर्ण तांत्रिक माहिती पुरवून त्यासाठी आवश्यक मदत वन विभागाचे कर्मचारी करतील. सदर उपाय योजनेचा लाभ घेण्यासाठी एकांतात असलेल्या घरमालकाचे नाव सौर कुंपण बसवणे बाबत संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभा ठरावा मध्ये असणे अनिवार्य आहे तसेच २५ टक्के रक्कम लाभार्थीने भरणे बंधनकारक असून या योजनेचा संबंधित एकांतात असलेल्या परिवाराला लाभ घेता येईल. संबंधित कुटुंबास या उपक्रमाबाबत तांत्रिक माहिती दिली जाईल व ते लावून देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कुटुंबाची राहील, असे उपवनसंरक्षक सातपुते यांनी सांगितले. शेतकऱ्यांना या सौरकुंपनाबाबत अधिकाधिक माहिती मिळावी व शंकेचे समाधान व्हावे म्हणून या उपकरणाबाबत संकल्प दर्डा व संदेश दर्डा यांच्या मार्फत या दरम्यान वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्कू टिमला ट्रेनिंग देण्यात आले. यामध्ये विशेष करून झटका मशीन, बॅटरी, सौरऊर्जा प्लेट व सौर कुंपण कसे कार्य करते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच यापासून आपण कशी काळजी घ्यावी व हे उपकरण अधिकाधिक कसे टिकून ठेवता येईल त्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत जुन्नरच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, ओतूर चे वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ,ओतूर वनपरीक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्कू मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.