राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या (Maharashtra Elections 2024) सभांनी राजकारण चांगलंच तापलं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) सांगलीत सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. ६ नोव्हेंबरला इंडिया आघाडीची (INDIA Alliance) सभा झाली. यात काही गॅरंटी त्यांनी राज्यातील जनतेला दिल्या. त्यांनी इतक्या घोषणा केल्या आहेत की त्या पूर्ण करणार कसं. असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काही चिंता करू नका असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीला गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात ह्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाहीत. अरे, बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार.. बापाचा विषयच नाही इथे.. काकाच हा सगळा विषय पूर्ण करणार तुम्ही काहीच चिंता करून नका.. असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी आमची सगळी टोळी तिकडे गेली. मलाही ऑफर होती. पण, मी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत मी निष्ठा सोडणार नाही. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मंत्रिमंडळात घेतलं. सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर आर. आर. पाटलांची सही होती म्हणता. पण नंतर सरकार बदललं होतं. नंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली होती. नंतर तीच कगदपत्रे अजित पवारांना बोलावून दाखवण्यात आली. मात्र त्या फाइलवर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस () यांचीच सही होती ना.. असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही (Mukhyamantri Mazi Ladki Bahun Yojana) जयंत पाटील यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) बहिणी लाडक्या झाल्या आहेत. पण आता आमच्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना फसणार नाहीत अशी खोचक टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.