9.9 C
New York

Assembly Elections : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सिंधी समाजाचेच वर्चस्व

Published:

नवनीत बऱ्हाटे…..

उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव असा मतदारसंघ आहे, (Assembly Elections) जिथे सर्वाधिक सिंधी भाषिकांची संख्या आहे. भारताच्या फाळणीपूर्वी ही एक लष्करी छावणी होती, परंतु फाळणीनंतर केंद्र सरकारने या छावणीचे रूपांतर निर्वासित छावणीत केले. सिंधी समाजाने, औद्योगिक दृष्टिकोनातून आणि समर्पणाने शून्यातून हे शहर एक औद्योगिक महानगर झाले आहे. सिंधी समाजाने आपल्या मेहनतीच्या जोरावर या छावणीचे रूपांतर एका औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त नगरीत केले. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली ठसा उमटवला. आजही या मतदारसंघात राजकीय पातळीवर सिंधी समाजाचे वर्चस्व दिसून येते, कारण स्थापनेपासून आतापर्यंत येथे फक्त सिंधी समाजाचे आमदारच निवडून आले आहेत.

उल्हासनगरच्या विधानसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत केवळ सिंधी समाजाचेच उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी 1952 च्या निवडणुकीत नेवंदराम गुरबानी आणि 1957 मध्ये पराचाराम विद्यार्थी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याच्या स्थापनेनंतर पराचाराम विद्यार्थी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. त्यानंतर, सन्मुख इसरानी यांनी दोनदा, शीतलदास हरचंदानी यांनी तीनदा, पप्पू कलानी यांनी तीनदा, ज्योती कलानी यांनी एकदा आणि कुमार आयलानी यांनी दोनदा विजय मिळवून आमदार पदावर हक्क मिळवला. आज सुद्धा विद्यमान आमदार म्हणून भाजपचे कुमार आयलानी हे पद सांभाळत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत २० तारखेला होणाऱ्या मतदानात १९ उमेदवार रिंगणात आहेत. विविध जाती धर्माचे उमेदवार रिंगणात उतरले असले तरी नेहमीप्रमाणे मुख्य लढत सिंधी भाषिक उमेदवारांमध्येच होणार, असेच स्पष्ट चित्र दिसत आहे. यंदा भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीने विद्यमान भाजपा आमदार कुमार आयलानी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांना महाविकास आघाडीने तिकीट दिले आहे. कुमार आयलानी हे विद्यमान आमदार म्हणून लोकांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे ओमी कलानी यांच्यासाठी ही निवडणूक मोठे आव्हान आहे. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा आणि उल्हासनगरच्या विकासासाठी योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी सिंधी समाजाच्या हक्काचे प्रतिनिधित्व कोण साधणार, हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.

शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज

या प्रमुख लढती बरोबरच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बंडखोर भरत गंगोत्री, वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता, आणि मनसेचे भगवान भालेराव हे देखील संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या प्रचार मोहिमा चालवल्या आहेत. उल्हासनगरच्या निवडणुकीत सिंधी समाजाचे वर्चस्व कायम राहणार की बदलाच्या नावाने कोणी नव्याने विजयी होणार, यावर सर्वांचे लक्ष आहे. या विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणताही असो, परंतु यावेळी हा निकाल उल्हासनगरच्या राजकीय समीकरणांना नव्या दिशेने नेऊ शकतो.

उल्हासनगरच्या मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराने आपापल्या पद्धतीने निवडणूक प्रचार चालवला आहे. सिंधी समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रयत्नशील असलेले उमेदवार एकमेकांना टक्कर देत आहेत, तर अन्य समाजातील उमेदवारांनी देखील आपले अस्तित्व दाखवण्यासाठी संधी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील नागरिकांनी मतदानासाठी सज्ज व्हावे, अशी अपेक्षा सर्व उमेदवारांकडून केली जात आहे. उल्हासनगरच्या या विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार विजयी होतील, ते शहराच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. यामुळे, कोणता उमेदवार विजयी होणार, हे पाहण्यासाठी संपूर्ण शहर उत्सुकतेने प्रतीक्षेत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img