महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना आमच्यावर दहशतीचा आरोप करता, तर मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात काढावीशी का वाटते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या तालुक्यात तुम्ही फक्त परिवर्तन करा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मी घेतो असं देखील विखे पाटील म्हणाले.
या सभेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डीत दहशत असती, तर संगमनेरच्या मालपाणी परिवाराला वॉटरपार्कचा प्रकल्प उभारावा वाटला असता का? या तालुक्यातील आमदारांचे बंधू आमच्या तालुक्यात येवून 20 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे शासकीय कामे करतात तेव्हा त्यांना दहशत वाटली नाही का? संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या भावाने राहाता पंचायत समितीचे 12 कोटी रुपयांचे काम केले त्यांना विचारा तेथे दहशत होती का? असं देखील यावेळी विखे पाटील म्हणाले.
काँग्रेसचा बंडखोरांना दणका! पाच नेते सहा वर्षांसाठी निलंबित
बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत विखे पाटील म्हणाले की, जर दहशत असती तर आमदार थोरातांना सुद्धा राहात्यामध्ये अमृतवाहिनी बँकेची शाखा काढाविशी वाटली असती का? असा प्रश्न उपस्थित करून खरी दहशत तर तुमच्या तालुक्यात आहे. वर्गात जाऊन प्राध्यापकांना मारण्याची संस्कृती आमची नाही. स्वता:ला सुसंस्कृत म्हणवून घेता तर धांदरफळ सभेनंतर महिलांवर केलेल्या हल्याितच्या बाबत माफी मागण्याची दानत तुमची नाही. असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, या तालुक्यात कारखाना पद्मश्री विखे पाटील, बी.जे.खताळ पाटील, भास्करराव दुर्वे, दत्ता देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे उभा राहिला आहे पण याची तुम्हाला आठवण राहिली नाही. तुम्ही वर्षानुवर्षे केवळ स्वता:च्या मक्तेदाऱ्या तयार करुन माफिया निर्माण केले पण आज तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे.
युवक रोजगार मागत आहे. पण तोही तुम्ही त्यांना देत नाही. तुम्ही कोणता विकास केला. जोर्वे गावात तुमच्या घराकडे जाणारा रस्तासुद्धा मलाच करुन द्यावा लागला. अशी टीका या सभेत बोलताना विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.