विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला (Maharashtra Elections 2024) सुरुवात झाली आहे. यातच नाशिक जिल्ह्यात (Nashik News) एक खळबळजनक घटना घडली आहे. खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करून देतो त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे दिले नाहीत तर मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे आहेत त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असेल असे सांगून एका जणाने उमेदवाराकडे पाच लाख रुपये खंडणी मागितली. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास मुंबई नाका येथील उमेदवाराच्या कार्यालयात एक युवक आला. कार्यालयात उपस्थित असलेल्या एका जणाला तो म्हणाला मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून १० पैकी तीन ते चार मते तुम्हाला मिळवू देतो. यासाठी तुम्ही मला ४२ लाख रुपये द्या. त्यापैकी पाच लाख रुपये आता द्यावे लॉगतील अशी मागणी त्याने केली. कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी नकार दिला.
आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात
पैसे दिले नाही तर ईव्हीएम प्रोग्रामिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमच्या उमेदवाराचा पराभव करील अशी धमकी त्याने दिली. आपला पत्ता सांगून तो निघून गेला. कार्यालयातील लोकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना देत फिर्याद दाखल केली. यानंतर तपास करत पोलिसांनी भगवानसिंग चव्हाण (मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले.
आता पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. त्याच्या बरोबर आणखी कोण आहे याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. निवडणुकीच्या काळात पैसे कमावण्याची संधी पाहून आपण असे केल्याचे त्याने मान्य केले आहे. भगवानसिंग चव्हाण हा मूळचा राजस्थानातील गोगरा अजमेर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे रोजगाराच्या निमित्ताने पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच तो शहरात आला होता.