राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections 2024) आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पण, अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बसणार आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. यानंतर आता या बंडखोर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे. ज्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलल्याने काँग्रेसने सहा सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती. सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली. तसेच काही मतदारसंघांत काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली होती. त्यामुळे या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले.
‘राहुल गांधी अन् काँग्रेसच्या नौटंकीला कुणीच भुलणार नाही’, फडणवीसांचं जशास तसं उत्तर
राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांची भेट घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला. याचा परिणाम काही ठिकाणी दिसला. बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण काही मतदारसंघातील बंडखोरांनी पक्षाच्या आदेशालाही जुमानलं नाही. अर्ज माघारी घेतले नाहीत. आता अशा बंडखोरांवर पक्षाने कारवाईस सुरुवात केली आहे. पहिल्याच टप्प्यात पाच जणांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली.
रामटेक विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मूळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार,पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागूल तर कसबा मतदारसंघातील कमल व्यवहारे यांचा समावेश आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष निवडणुकीत उतरवलं. त्यांच्या उमेदवारीला खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबाही दिला. मात्र आता काँग्रेसने कडक कारवाई करत जयश्री पाटील यांनाही निलंबित केलं आहे.