राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections 2024) आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पण, अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बसणार आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. यानंतर आता या बंडखोर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. कारवाईचा पहिला बडगा भाजपने (BJP) उगारला आहे.
निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून ४० सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती. सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली. त्यामुळे या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले.
मला त्या रस्त्याने जायला लावू नका… अन्यथा… -शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांची भेट घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला. याचा परिणाम काही ठिकाणी दिसला. बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण काही मतदारसंघातील बंडखोरांनी पक्षाच्या आदेशालाही जुमानलं नाही. अर्ज माघारी घेतले नाहीत. आता अशा बंडखोरांवर पक्षाने कारवाईस सुरुवात केली आहे. पहिल्याच टप्प्यात तब्बल ४० जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यामध्ये बडनेरा येथील तुषार भारतीय, नालासोपारा येथील हरिश भगत, मागठाण्यातील गोपाळ जव्हेरी, विशाल परब, श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते, नेवाशातील बाळासाहेब मुरकुटे, अक्कलकोट येथील सुनील बंडगर, अमरावतीमधील जगदीश गुप्ता आणि साकोली येथील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण ४० जणांचा समावेश आहे. भाजप नेते माजी खासदार रवी राणा यांनी बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. यामध्ये विशेषतः तुषार भारतीय आणि श्रीकांत भारतीय यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती.