12.1 C
New York

Heena Gavit : नंदूरबारमध्ये भाजपला धक्का! माजी खासदार हिना गावितांचा पक्षाला रामराम

Published:

विधानसभा निवडणुकीत काल अर्ज माघारीची मुदत संपली. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी झालीच आहे. या बंडखोरांचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही बसणार आहे. बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी मात्र अपयशी ठरले. आताही भाजपला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी (Heena Gavit) भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हिना गावित यांच्या या निर्णयाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्याने पक्षाला अडचण होऊ नये म्हणून मी राजीनामा देत आहे, असे गावित यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाच्या राजीनामा दिला आहे. हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून इच्छुक होत्या. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तशी मागणी देखील केली होती. परंतु मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला. त्यामुळे गावित यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असे सांगितले जात होते.

राजीनामा देण्याचे कारण वेगळे असून भाजपचे मित्र पक्ष असलेले शिवसेना ही सातत्याने भाजपच्या विरोधात प्रचार करत आहे. महाराष्ट्राच्या महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेचे जिल्हा नेते विरोधी काँग्रेस पक्षाचा सर्वकाळ मदत करत असतात. लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी मिळू नये इथपासून तर पराभूत करण्यापर्यंत त्यांनी भूमिका बजावली आहे. तरीही वरिष्ठ स्तरावरुन त्यांना आवर घालण्यात आला नाही.

अवसरीला मेडिकल कॉलेज सुरू करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

आताही विधानसभा निवडणुकीत असाच प्रकार सुरू आहे. नंदूरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करून भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून जर मी निवडणूक लढवली तर भारतीय जनता पार्टीचा एक आमदार वाढू शकतो म्हणून मी उमेदवारी मागितली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांच्या आग्रहवरून शिवसेनेला जागा दिली गेली. शिवसेने संदर्भात सर्व राजकीय घटनाक्रम पक्षातील वरिष्ठांना निदर्शनास आणून दिले तरी देखील त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

भारतीय जनता पार्टीची जबाबदार सदस्य असताना महायुतीमधील वातावरण बिघडू नये आणि घटक पक्षांमधील अंतर वाढू नये यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाच्या राजीनामा देत असल्याचे डॉ. हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांच्या या निर्णयाने महायुतीच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img