बारामतीतील पवार कुटुंबात राजकीय फुट पडली आहे. (Pawar Vs Pawar) आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काका पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यानंतर पवार कुटुंबात राजकीय फुट पडली, पण नात्यात फुट पडली का? असा प्रश्न निर्माण होत होता. पवार कुटुंब एकत्र येवून दिवाळी पाडवा साजरा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होत.
बारामतीत मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंब दिवाळी पाडवा साजरा करत असते. सर्व पवार कुटुंबीय गोविंदबागेत पाडव्यासाठी एकत्र (Diwali Padwa) जमतात. राज्यातील विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते येतात. पवार कुटुंबीय त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देतात. पण यंदा मात्र बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे होत आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतंत्रपणे दिवाळी पाडवा साजरा करत आहे. शरद पवार गोविंदबागेमध्ये तर अजित पवार काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा साजरा करणार आहेत.
दिवाळी पाडवा, अजितदादा अन् गोल्डन मिठाईची चर्चा
पाडवा एकत्र साजरा करण्याची पवार कुटुंबाची परंपरा खंडित होताना दिसत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित म्हणाले की, गोविंदबागेत खूप गर्दी होते. मोठी रांग लागते, लोकांना खूप वेळ ताटकळत उभं राहावं लागतं. त्यामुळे गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलाय. पूर्वी पाडवा वर्षानुवर्षे काटेवाडीमध्येच साजरा केला जात होता, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. जनतेचा त्रास कमी व्हावा, यासाठी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. तर विधानसभा निवडणुकीसाठी आता बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार मैदानात आहे. काका-पुतण्याच्या लढाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय.