8.3 C
New York

Maharashtra Politics : अशी ही घराणेशाही, काका, पुतणे, भाऊ, मुले यांचीच चलती!

Published:

जकारणातील घराणेशाही आता लाेकांनी स्वीकारलीयं का? राजकीय पक्षांना नेत्यांच्या उमेदवारांना तिकिट (Maharashtra Politics) देताना आपण निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करताेय अशी भावनाही आता हाेत नाही का? निष्ठावान कार्यकर्ता पुढे जाईल अशी भीती वाटते त्यामुळे ते घरातीलच काेणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात? हे सगळे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप. काेणाची बहिण, काेणाचा भाऊ निवडणुकीत उतरलाय. पूर्वी नेत्यांची मुले दादा, भय्या म्हणून मतदारसंघात काम करायचे. वडील निवृत्त झाल्यावर आपल्याल संधी मिळेल का? हे पाहायचे. पण आता नेत्यांनी स्वत: राजकारणात सक्रीय असतानाच कुटुंबातील काेणाला तरी सेट करण्याची नवीन पध्दत सुरू केली आहे.

मुंबईतील धारावी मतदारसंघातून खासदार आणि मुंबई प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्याेती गायकवाड यांना काॅंग्रेसने उमेदवारी दिलीय. त्यामुळे गेल्या 44 वर्षांपासून काॅंग्रेसचा प्रभावी चेहरा असलेले रवी राजा यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वर्षा गायकवाड लाेकसभेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे आपली हक्काची धारावीची जागा बहिणीला देऊन दुसरे नेतृत्व तयार हाेऊ नये याची काळजी त्यांनी घेतली आहे.

ही घराणेशाही केवळ काॅंग्रेसमध्येच आहे असेही नाही. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपले बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. विनोद शेलार हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. पण भाजपच्या चार वॉर्ड अध्यक्ष तसेच काही पदाधिकाऱ्यांनी विनोद शेलार यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. भाजपने स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिला असल्याचा आक्षेप घेतला आहे. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनाच पत्र लिहिले आहे.

घराणेशाहीचे हे लाेण केवळ मुंबईपुरते मर्यादित नाही. उर्वरित महाराष्ट्रात तर, अधिक पसरलेले आहे. पारनेरचे आमदार असलेले निलेश लंके यांनी नगर दक्षिणमधून सुजय विखे यांचा धक्कादायक पराभव करून खासदार झाले. फाटका कार्यकर्ता म्हणून लाेकांनी लंकेंना एकेकाळी डाेक्यावर घेतले हाेते. प्रस्थापितांविराेधातील त्यांच्या लढ्याला बळ दिले हाेते. पण आता निलेश लंकेच प्रस्थापित झाले आहेत. त्यांनी आपल्या पत्नी राणी लंके यांना पारनेरमधून उमेदवारी दिली आहे.

बंडोबांचं अर्धशतक! भाजपला सर्वाधिक टेन्शन; काँग्रेसही हैराण

माजी मुख्यमंत्री आणि सिंधूदुर्गचे खासदार नारायण राणे यांची दाेन्ही मुले विधानसभा निवडणूक लढत आहे. नितेश राणे कणकवलीतून मैदानात आहेत. कुडाळची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली हाेती. त्यामुळे वडील आणि एक भाऊ भाजपमध्ये असताना निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राणे बंधू तरी किमान महायुतीतीलच दाेन पक्षांत आहेत. पण शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर- मंगळवेढ्यात शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.

स्वत: तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत. त्यामुळे राज्यात काेणतेही सरकार आले तरी सावंत कुटुंबातील एक सदस्य सत्ताधारी पक्षात राहणार आहे. असाच प्रकार नवी मुंबईत नाईक कुटुंबांत म्हणता येईल. वडील भाजपकडून तर मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीतून लढत आहे. पण समाेरासमाेर नाही तर शेजारच्या मतदारसंघात. गणेश नाईक ऐरोलीतून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचा मुलगा संदीप यांना बेलापूरमधून उमेदवारी हवी हाेती. मात्र, मंदा म्हात्रे यांच्यासमाेर त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी घेतली आहे.

याच पध्दतीने नाशिकमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याच्या शेजारीच असलेल्या नांदगाव मतदारसंघातून त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्याविरुध्द लढत आहेत. नैतिकता आहे म्हणून आम्ही समीर भुजबळ यांना घड्याळाच्या चिन्हावर लढविले नाही, अशी मल्लानाथी छगन भुजबळ यांनी केली आहे.

विदर्भातील काटाेल मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र सलील देशमुख येथून लढत आहेत. स्वत:ला लढण्यास काही अडचण असल्यास कुटुंबात उमेदवारी द्यायची हा प्रकार केवळ काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीत नाही. घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपनेही हेच केले आहे. गाेळीबार प्रकरणात कल्याणचे आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. त्याुळे भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी दिली. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते प्रकृतीच्या कारणास्तव लढू शकत नसल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभा लढत आहेत.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी देण्यात आली. आता त्यांच्या जागी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप लढत आहेत. जळगाव जिल्ह्यात माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे भाजप उमेदवार आहेत. भाेकरदन मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशाेक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया लढत आहेत. या मतदारसंघात अशाेक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण सध्याच्या आमदार आहेत.

भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेना शिंदे गटानेही नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या वाटल्या आहे. छत्रपती संभाजीनगरमधून खासदारकीची निवडणूक जिंकलेले संदिपान भूमरे यांनी विधानसभेची आपली जागा सेफ ठेवण्यासाठी मुलगा विलास यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र वायकर यांनीही खासदार झाल्यावर आपल्या जाेगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पत्नी मनिषा वायकर यांना उतरविले आहे. दर्यापूरमधून आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ लढत आहेत. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांच्या नाराजीची लाेकसभा निवडणुकीत खूप चर्चा झाली. त्यांना आता शिवसेनेने राजापूरमधून उमेदवारी दिली आहे. स्वत: उदय सामंत त्याच्या शेजारीच असलेल्या रत्नागिरी मतदारसंघातून लढत आहेत.

नेत्यांच्या घराणेशाहीवर पक्षाच्या प्रमुखांनी अंकुश ठेवायचा. पण त्यांच्याच घरात घराणेशाही दिसून येते. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधान परिषदेतील आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव आदित्य वरळी मतदारसंघातून लढत आहेत. आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे कुटुंबातीलच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीममधून प्रथमच नशीब अजमावत आहेत.

महाराष्ट्रातील पाॅवरफुल पवार घराण्यातही ठाकरे कुटुंबाप्रमाणेच अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभं केलंय. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र यांचे चुलत बंधू राेहित पवार कर्जत- जामखेड मतदारसंघात लढत आहेत. पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील. ही तर झाली विद्यमान नेत्यांनी कुटुंबातील दिलेली उमेदवारी. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या उमेदवार यादीवर नजर टाकली तर माजी आमदार- खासदारांच्याच कुटुंबात उमेदवाऱ्या मिळाल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img