राज्यात दिवाळीतच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज दिवाळी पाडवा. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी वेगळाच ठरला. शरद पवार यांनी गोविंदबागेत कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत पाडवा साजरा केला तर दुसरीकडे अजित पवार यांनीही काटेवाडीत असाच पाडवा साजरा केला. पवार कुटुंबाचे दोन वेगवेगळे पाडवे महाराष्ट्राने पाहिले. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी (Sharad Pawar) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांना खोचक टोले लगावले.
शरद पवार म्हणाले, एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता. अजित पवार सोडले तर बाकी सगळे गोविंद बागेत हजर होते. त्यांच्या बहिणी देखील होत्या. त्यांचे भाऊ देखील असतातच. अजित पवार यांना वेळ मिळाला नसेल पण बाकीचे सर्व आले. 1967 पासून पवार कुटुंबीय एकत्रित दिवाळी साजरी करतात. परंतु. यावेळचं चित्र वेगळं होतं. शरद पवार आणि कुटुंबियांनी गोविंद बागेत दिवाळी साजरी केली तर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी या त्यांच्या गावी दिवाळी साजरी केली.
राज्यातील आणि देशातील सध्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. ही परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निवडणूक झाल्यानंतर दोन महिन्यांतच कळेल की या सरकारच्या योजनांचं नक्की काय झालं असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
बीडमध्ये पवारांचे गणित चुकलंय; हक्काच्या जागा जाणार?
अजित पवार यांनी काही दिवसांपू्र्वी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या संदर्भात बोलणे योग्य नाही. आर. आर. पाटील स्वच्छ राजकारणी म्हणून राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध होते आर. आर. पाटील यांच्या बाबतीत असे काही घडायला नको होते. परंतु, सत्ता असली की अशा पद्धतीने वापर केला जातो. काहीही बोलले जाते, असे शरद पवार म्हणाले.
आम्ही सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कधी केला नाही. हा प्रश्न कुणी काढला हे सांगण्याचीही गरज नाही. राज्याच्या राजकारणातील सर्वात स्वच्छ व्यक्ती म्हणून आर. आर. पाटील यांचा लौकिक होता. ते उत्तम प्रशासक होते. त्यांच्या बाबतीत अशी उलटसुलट चर्चा होणं अशोभनीय आहे अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.