22.2 C
New York

Diwali Pahat : डीजेच्या गाण्यावर डोंबिवलीकर तरुणाईने साजरी केली दिवाळी पहाट

Published:

डोंबिवली ( शंकर जाधव ) दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर डोंबिवलीतील तरुणाईने पारंपरिक (Diwali Pahat) दिवाळी साजरी करण्याचा जल्लोष करत विद्युत रोषणाईत झळाळलेल्या फडके रस्त्यावर एकत्र येण्याची परंपरा जपली.श्री गणेश मंदिर संस्थानमधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, तसेच मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक पोशाखात सजलेल्या तरुणाईने या मार्गावर गर्दी केली होती. फडके रोडचा परिसर विविध रंगांच्या पेहरावाने रंगीबेरंगी झाला होता, ज्यात उत्साह, आनंद, आणि जल्लोष यांची भर होती.

फडके रोडवरील बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक या संपूर्ण पट्ट्यात तीनशे मीटरच्या परिसरात फक्त तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. गळाभेट, हस्तांदोलन, आणि शुभेच्छा देणारी ही मंडळी दिवाळीच्या खास वातावरणात रंगून गेली होती. फडके रोडकडे येणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक पोलिसांनी मार्गबंदी केली होती, ज्यामुळे फडके रोडचा परिसर फक्त चालणाऱ्या नागरिकांसाठी खुला होता. गणेश मंदिरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून या सणाचे सौंदर्य वाढवण्यात आले होते, आणि लहान मुले, वृद्ध नागरिक, तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांनी या उत्सवात सहभाग घेतला होता.

दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या नवीन वाहनांची पूजा करण्यासाठी वाहनमालकांनी गणेश मंदिरासमोर गर्दी केली होती. अनेक नव्या वाहनांच्या पूजेचे दृश्य बघायला मिळाले, ज्यात दुचाकी आणि मोटारींचा समावेश होता. ही वाहने रांगेत उभी असताना, विविध पोशाख परिधान केलेले तरुण-तरुणी आपल्या वाहनांसह फोटो काढत होते. तरुणाईमध्ये नव्या वाहनांचा जल्लोष बघून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने ठेवलं लाडक्या लेकीचं नाव

फडके रोडवर दोन दिवसांपूर्वीच विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्याने संपूर्ण परिसर झळाळून निघाला होता. या आकर्षक रोषणाईने येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले होते. अनेक कुटुंबियांनी आपल्या पाळीव श्वानांना देखील आकर्षक पोशाख परिधान करून या जल्लोषात सहभागी करून घेतले होते.अंबिका हॉटेल परिसरात डीजेचा जोरदार दणदणाट सुरू होता, ज्याच्या तालावर तरुणाई थिरकत होती. तर आप्पा दातार चौकात गणेश मंदिर संस्थानतर्फे नृत्याचे कार्यक्रम आयोजिले गेले होते, ज्यात अनेक तरुण-तरुणी उत्साहाने सामील झाले होते. फडके रोडवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात होते, तसेच अग्निशमन दलाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते.दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीच्या फडके रोडवरील या भेटीतून अनेकांच्या नात्यातील बंध अधिक घट्ट झाले. पूर्वी अनेक प्रेमीयुगुलांचे नातेसंबंध फडके रोडवरील या दिवाळी भेटीतून अधिक दृढ झाले असल्याची चर्चा आहे. अशा यादगार भेटींच्या निमित्ताने फडके रोडवरील दिवाळी साजरी करणे डोंबिवलीकर तरुणाईसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img