ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )
जुन्नर (Junnar) वनपरीक्षेत्रात मांजरवाडी येथील सुतारवाडा या ठिकाणी बिबट समस्या असल्याने,येथे बिबट्या पासून सुरक्षिततेसाठी वनविभाग जुन्नर मार्फत अनायडर यंत्राचा वापर करण्यात येत आहे. या ठिकाणी तीन बिबटे व नंतर पाच बिबट दिसून आल्याने या ठिकाणी दिल्लीहून आणलेल्या अनायडर यंत्राचा प्रथमत:च वापर करण्यात येत आहे. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून जुन्नर वनविभागात ५० अनायडर यंत्रे चाचणी करीता खरेदी करण्यात आली आहेत, पैकी एक यंत्र बुधवार दि.३० रोजी जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते मांजरवाडी येथील सुतारवाडा येथे लावण्यात आले. ग्रामस्थांची विशेष काळजी घेतली जावी,नागरिक सतर्क व्हावेत व त्यांना या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने धोक्याचा इशारा या यंत्राच्या माध्यमातून होईल. या यंत्राच्या समोरून जर ती ३० ते ४० मीटर अंतरावरून जर बिबट प्राणी गेला तर, या मशीन मधून मोठा कर्कश ध्वनी निर्माण होतो व तो आवाज ऐकून बिबट तेथून निघून जातो. जर बिबट दुसऱ्यांदा जर तिथे आलाच तर तो तिसऱ्यांदा या ठिकाणी आवाजामुळे पुन्हा येण्याचे धाडस करत नाही असा अनायडर यंत्र वापरानंतरचा अनुभव असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
जुन्नर वनविभागात एकूण ५० अनायडर यंत्रे आणण्यात आल्या असून ३ यंत्रे नारायणगाव कोल्हेमळा, आर्वी येथे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने बसविण्यात येणार असून पैकी १ मांजरवाडी येथील शेतकरी जनार्दन मुळे यांच्या शेतात घरापासून १५ ते २० फूट अंतरावर लावण्यात आले आहे. घराजवळ बिबट्या येऊ नये व अपघात घडू नये याकरिता या यंत्राचा वापर करण्यात येत आहे. सुतारवाडा येथे एकूण ४ घरे असून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने हा प्रयोग इथे या ठिकाणी करण्यात येत आहे. असे वनपरीक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. यावेळी १० ग्रामस्थांना अग्रोवनचा दिवाळी अंक – ‘पशुधन’ देण्यात आला की ज्यामध्ये बिबट प्राण्यांच्या हल्ल्यापासून कशी काळजी घ्यावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण सहाशे अंकाचे वाटप जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावातील पशुपालक शेतकऱ्यांना करून त्याद्वारे बिबट संबंधी जन जागृती करण्यात येत आहे.
अनायडर मशीनचा प्रयोग जर यशस्वी झाला तर घराजवळ येणाऱ्या बिबट्यांपासून सुरक्षितता राहण्यासाठी या यंत्राचा व्यापक वापर पुढे करता येऊ शकेल व अपघातांना आळा घालणे शक्य होणार आहे, असे मत उपवनसंरक्षक श्री सातपुते यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ, ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष जनार्दन मुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नाना चौधरी, पोलीस पाटील सचिन टावरे, शिवाजी चोपडा, वैभव राऊत, नमेश थोरात, गोरक्ष चौधरी, ग्राम सुरक्षा रक्षक दल सदस्य रामकृष्ण, श्री.चोपडा तुषार टेके आदी नागरिक उपस्थित होते.