ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )
नगर -कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती ओतूरचे (Otur) वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
सदरची घटना मंगळवार दि.२९ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राज लॉन्स मंगल कार्यालयासमोर घडली असून, सदर बिबट्या नर असून,त्याचे वय अंदाजे आठ वर्षे असल्याचे ठोकळ यांनी सांगितले.
सदरची घटना ओतूर वनविभागाला समजताच ओतूर च्या वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, वनरक्षक दादाभाऊ साबळे, वन कर्मचारी,किसन केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव,गणपत केदार तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य रूपेश कंटाळे ग्रामस्थ संतोष गायकवाड,मोहित ढमाले आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर बिबट्याला ताब्यात घेऊन शासकीय वाहनात माणिक डोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले,तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक बेल्हेकर,डॉ.अविनाश वेसलकर यांनी शवविच्छेदन करून, माणिक डोह येथे अग्निदहन करण्यात आले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.