राज्याच्या राजकारणात आजचा दिवस काँग्रेसला मोठे धक्के देणारा ठरला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा आज भाजपमध्ये दाखल झाले. तसेच कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपानंतर काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्याचेच पर्यावसान दिग्गज नेते पक्ष सोडण्यात होत आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी राजेश लाटकर यांना तिकीट मिळालं. पण नंतर त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाला. तेव्हा त्यांना तिकीट नाकारून माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. या घडामोडींमुळे आमदार जाधव नाराज झाल्या. त्यांनी आज थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघाच शिंदे गटाच्या उमेदवाराला फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकनाथ शिंदे गटाने या मतदारसंघात राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. महाडिक यांनीही भाजपकडून प्रयत्न केले होते. मात्र शिंदे गटाने दबाव झुगारून राजेश क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली. तर दुसरीकडे राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जोरदार विरोध झाला. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींना नाईलाजाने लाटकर यांची उमेदवारी रद्द करावी लागली.
मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक
Congress रवी राजांचाही काँग्रेसला धक्का
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. रवी राजा यांनी गुरूवारी कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यात त्यांनी लिहिलं की, माझ्या ४४ वर्षांच्या कॉंग्रेस पक्षाच्या सेवेचा आदर केला जात नसल्यावर माझ्या विश्वास बसला आहे. यामुळं मी सर्व पदांचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं रवी राजा यांनी खर्गे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं.