राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज (Maharashtra Elections 2024) दाखल झाले आहेत. आता अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे बंडखोर आणि नाराज मंडळींची समजूत काढण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीने सुरू केले आहेत. त्यामुळे अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे खरे (Elections 2024) चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत राज्यात वेगळ्याच राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
यंदा निवडणुकीत सहा मोठे पक्ष आणि अन्य लहान पक्ष आहेत. त्यामुळं कुणाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. निवडणुकीनंतरची परिस्थिती आणखी रंजक होणार आहे. विशेष करून मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच पहायला मिळेल. यात संख्याबळाला महत्त्व प्राप्त होईल. अशी अनिश्चित परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते असा अंदाज भाजप नेत्यांना (BJP) असावा. कारण भाजप आधीपासूनच सतर्क झाला असून भाजप नेत्यांनी दूरचा विचार करून काही निर्णय घेतले आहेत ज्यांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्यासोबत जाणून घ्या ‘या’ नेत्यांची संपत्ती ?
या निवडणुकीत भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील काही नेत्यांना एकनाथ शिंदे शिवसेना (Eknath Shinde) आणि अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) तिकीट दिलं आहे. यासाठी या नेत्यांनी त्या त्या पक्षात प्रवेशही केला आहे. कोणत्याही परिस्थितीत १६० जागा लढवायच्याच असा निश्चय भाजपच्या रणनीतीकारांचा होता. यावरून महायुतीत वादाचे प्रसंग घडले. जागावाटपावरून ओढाताणही दिसून आली. नंतर मात्र जे काही घडलं ते अचंबित करणारच होतं.
भाजपच्या ८ नेत्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळालं. तर चार जणांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. म्हणजेच भाजप सध्या १४८ जागांवर स्वतः च्या निवडणूक चिन्हावर लढताना दिसत असला तरी पक्षाच्या कोट्यात एकूण १६० उमेदवार आले आहेत. आता निवडणुकीनंतर या १२ जागांचा निकाल किती महत्त्वाचा ठरतो हे समजणार आहे. जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. त्यामुळेच भाजपने १२ उमेदवारांना दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरवल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपचे जे १२ नेते दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यात भाजप प्रवक्त्या शायना एनसी देखील आहेत. शायना एनसी यांना एकनाथ शिंदे शिवसेनेने मुंबादेवी मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. अंधेरी पूर्व मधून मुरजी पटेल तर कन्नड मतदारसंघातून भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. या व्यतिरिक्त राजेंद्र राऊत, निलेश राणे, राजेंद्र गावित, विलास तरे आणि संतोष शेट्टी देखील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
BJP दोन माजी खासदारांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
सांगलीतील भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार गटाने त्यांना कवठे महांकाळ मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तसेच निशिकांत पाटील, राजकुमार बडोले, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं आहे. हे सर्व नेते आधी भाजपात होते मात्र निवडणुकीआधी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एका खास रणनीतीनुसार या नेत्यांनी या पक्षांत प्रवेश केल्याची माहिती आता मिळाली आहे. या व्यतिरिक्त राज्यात अन्य काही मतदारसंघांतही भाजपाच्या नेत्यांनी शिंदे गट किंवा अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवलं आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात भाजप नेते विठ्ठलराव लंघे पाटील यांना शिंदे गटाने तिकीट दिलं आहे.