राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) यावेळी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे.
तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील महाविकास आघाडीच्या प्रचारसाठी महाराष्ट्रात येणार आहे. राहुल गांधी 6 नोव्हेंबरला मुंबईत सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली,डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीकडून काँग्रेसची पहिली प्रचार सभा 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी मैदांनावर पार पडणार आहे आणि या सभेसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) , उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे. तसेच या सभेत राहुल गांधी काँग्रेसकडून महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी जाहीर करणार आहे. असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, 6 नोव्हेंबरला राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. दोन्ही नेते नागपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमानंतर काँग्रेससाठी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत आणि यावेळी महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 104 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेनेकडून 80 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील 50 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मात्र कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार आहे याबाबत अधिकृत माहिती 4 नोव्हेंबरपर्यंत समोर येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे.