राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र आता (Maharashtra Elections) हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक (MVA) पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. याद्या जाहीर होताच अनेक ठिकाणी नाराजी आणि बंडखोरी उफाळून येत आहे. तर काही प्रसंग असेही घडत आहेत जिथे तिकीट कापले गेल्याने इच्छुकांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत आहेत. राजकारणात या गोष्टी दुर्मिळच म्हणाव्या लागतील. उमेदवारी मिळाल्यानंतर डोळ्यांत आनंदाश्रू तरळणं सहाजिक म्हणावं लागेल पण तिकीट कापलं गेलं म्हणून चार वेळा (Lakhan Malik)आमदार राहिलेला नेता अगदी हमसून रडतोय असं दृश्य महाराष्ट्राच्या आताच्या निवडणुकीत पहिलंच ठरलं असावं.
Lakhan Malik नेमकं काय झालं
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे विद्यमान आमदार लखन मलिक (Lakhan Malik) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या निर्णयामुळे भाजप आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. प्रसारमाध्यमांशी बोलतान त्यांचा कंठ दाटून आला आणि तोंडातून शब्दांऐवजी त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. लखन मलिक यांना ढसाढसा रडताना पाहून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी द्यायला पाहिजे होती. भाजप पक्षाने माझ्यावर अन्याय केला असे लखन मलिक यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आता मी पुढील निर्णय जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा आणि माझ्यासोबत राहावे असे आवाहन लखन मलिक यांनी यावेळी केले.
माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार खासदार अन् जरांगे पाटलांमध्ये मध्यरात्री खलबतं
भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं. आमदारकीच्या चार टर्ममध्ये कधीच भ्रष्टाचार केला नाही. कुठली संपत्तीही जमा केली नाही. पक्षाचा विचार थेट वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जनतेचाही माझ्यावर विश्वास होता म्हणूनच जनतेनं मला चार वेळा निवडून दिलं. आता कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करणार आहोत असे लखन मलिक म्हणाले.
भाजपाच्या पहिल्या यादीत लखन मलिक यांचं नाव नव्हतं. दुसऱ्या यादीत नाव असेल असं वाटत होतं. मात्र या यादीत वाशिम मतदारसंघात मलिक यांच्याऐवजी श्याम खोडे यांना तिकीट देण्यात आलं होतं. यादी पाहून लखन मलिक यांना धक्काच बसला. खोडे हे भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. पक्षाने यंदा श्याम खोडे यांना संधी दिली आहे.