नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘कलानी विरुद्ध आयलानी’ या दोन राजकीय दिग्गजांचा थरार पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ओमी कलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शरद पवार यांनी पप्पू कलानी यांच्यासोबत असलेल्या दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक दृढ केले आहे. तर भाजपने पुन्हा विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ओमी कलानी यांच्या उमेदवारीबाबत उल्हासनगरमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. काहींनी अंदाज वर्तवला होता की, ओमी कलानी भाजपात प्रवेश करतील किंवा शिवसेना (शिंदे गट) कडून निवडणूक लढवतील. मात्र, आज जयंत पाटील यांनी अधिकृतपणे ओमी कलानी यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उल्हासनगर विधानसभेसाठी ओमी कलानी यांना एकमुखाने पाठिंबा दिला आहे. याआधी, ओमी कलानी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘दोस्ती का गठबंधन’ करून डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती, परंतु विधानसभेसाठी त्यांनी शरद पवार यांचा पक्ष निवडला. गोव्यातील एका विशेष बैठकीत या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते, ज्यामध्ये पप्पू कलानी आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची पुन्हा एकदा प्रचिती आली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी बालाजी किणीकरांचा तिहेरी माफीनामा
दुसरीकडे उल्हासनगर विधानसभेत विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने, शहरातील राजकीय लढत आणखी तीव्र होणार आहे. काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत धाकधूक होती. भाजपने त्यांच्या उमेदवारांची निवड पक्षांतर्गत मतदान प्रक्रियेद्वारे केली होती, ज्यात उल्हासनगरमधील 250 हून अधिक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली होती. या प्रक्रियेत तीन प्रमुख नेत्यांची नावे समोर आली होती, परंतु अखेरीस कुमार आयलानी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
कुमार आयलानी यांची राजकीय कारकीर्द उल्हासनगर विधानसभेत चढ-उतारांनी भरलेली आहे. 2009 साली त्यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. मात्र, 2014 मध्ये ज्योती कलानी यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये त्यांनी ज्योती कलानी यांचा निसटता पराभव करत विधानसभेची जागा पटकावली. आता पुन्हा एकदा कलानी विरुद्ध आयलानी यांचा सामना रंगणार आहे.
उल्हासनगर विधानसभेत आगामी निवडणुकीत ओमी कलानी आणि कुमार आयलानी यांच्यातील लढत अधिक चुरशीची ठरणार आहे. एकीकडे शरद पवार यांची पप्पू कलानी यांच्याशी असलेली मैत्री ओमी कलानी यांच्या राजकीय भवितव्याला बळ देणार आहे, तर दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा आयलानी यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. उल्हासनगर शहरातील राजकीय समीकरणे तापलेली असताना, मतदारही या दोघांतील संघर्षाकडे लक्ष ठेवून आहेत. उल्हासनगरच्या राजकारणात दीर्घकाळापासून दोन्ही कुटुंबांचा प्रभाव आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे.