लोकसभा निवडणुकीपासूनच सांगली मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे. आताही विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) या जिल्ह्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण या ठिकाणी निवडणुकीच्या काही दिवस आधी मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काका पाटील चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आता संजय पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर असे झाले तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील निवडणूक रिंगणात दिसतील.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. महायुतीत भाजप आणि शिवसेनेची एक एक यादी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेने काल पहिली यादी जाहीर केली. राज्यात काही ठिकाणी अद्याप उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. यातच आता सांगलीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून रोहित पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचं उत्तर आता मिळू लागलं आहे. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता संजय पाटील लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पाटील विरुद्ध पाटील अशी लढत सांगलीकरांसाठी नवीन नाही. अनेक वर्षांपासून या घराण्यांतील राजकीय वाद कायम आहेत.
ठाकरेंच्या यादीत ट्विस्ट, धाराशिवमधील ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलणार
संजय पाटील लोकसभेच्या रिंगणातही होते. त्यावेळी या मतदारसंघाची चर्चा देशभरात झाली होती. या मतदारसंघावरून आघाडीत वादही झाले होते. ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपने संजय पाटील यांना तिकीट दिलं होतं. मात्र या निवडणुकीत विशाल पाटील यांनी बाजी मारली. आता लोकसभेतील पराभवातून सावरत संजय काका पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जागावाटपात तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. तेव्हा संजय पाटील यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर अजित पवार गटालाही रोहित पाटील यांच्या विरुद्ध तगडा उमेदवार मिळाला आहे. आता येथे पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि पाटील विरुद्ध पाटील अशी लढत होणार आहे. या लढतीत मतदार कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात याचं उत्तर निकालानंतर मिळणार आहे.