पिंपरी चिंचवड मतदारसंघातून शरद पवार कुणाला तिकीट देणार हा प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे. मात्र इच्छुकांकडून शरद पवारांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नाना काटे (Nana Kate) यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. फक्त नाना काटेच नाही तर शरद पवारांच्या भेटीसाठी राहुल कलाटे आणि चंद्रकांत नखाते देखील आले होते. या इच्छुकांनीही चर्चा केली. मग पिंपरी चिंचवडचं तिकीट नक्की कुणाला मिळणार? शरद पवारांच्या मनात नेमकं कुणाचं नाव आहे? पिंपरी चिंचवड मतदारसंघ कुणाला सुटणार या प्रश्नांची उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत. मात्र शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
नाना काटे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. महायुतीत पिंपरी चिंचवड भाजपाच्या वाट्याला गेला आहे. येथे भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाना काटेंची अडचण झाली आहे. त्यांनी उमेदवारीसाठी शरद पवार गटाकडे चाचपणी सुरू केली आहे. काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती काटेंनी दिली आहे.
नाना काटे म्हणााले, मला जयंत पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी भेटायला या म्हणून सांगितलं. नंतर ताईंचाही (सु्प्रिया सुळे) फोन आला. त्यानुसार मी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी सेंटरला निघालो. त्यावेळी तिथे चंद्रकांत नखाते, राहुल कलाटे मला वायबी सेंटरमध्ये दिसले. त्यानंतर सुप्रिया ताईंनी पिंपरी चिंचवडमधील इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. शरद पवार यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा झाली. अद्याप हा मतदारसंघ कुणाला सोडायचा याचा निर्णय झालेला नाही. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले. त्याआधी इच्छुकांत निर्णय घ्या अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या.
उमेदवारीची घोषणा होताच अमित ठाकरेंना राऊतांचे आव्हान
मग तुमच्या इच्छुकांत काही निर्णय झाला का असा प्रश्न विचारला असता काटे म्हणाले, आम्ही आमची सर्व माहिती दिली. तसेच पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहिल असे त्यांना सांगितले. राहुल कलाटे यांना जर उमेदवारी दिली गेली तर तुमचा त्यांना पाठिंबा राहणार का? या प्रश्नाच्या उत्तरात काटे म्हणाले, पवार साहेबांना आम्ही आधीच सांगितलं आहे की समोर आम्ही तिघे आहोत तुम्ही काय तो योग्य निर्णय घ्या. प्रत्येकाची माहिती तपासून निर्णय घ्या. तुमच्या सर्वेनुसार तुम्ही काय तो निर्णय घ्या.
Nana Kate तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर..
तुम्हाला तिकीट मिळालं तर राहुल कलाटेंची काय भूमिका राहिल? तुमची काही चर्चा झाली आहे का? असे विचारले असता शरद पवार साहेबांसमोर आम्ही तिघांनीही सांगितलं आहे की तुम्ही घ्याल त्या भूमिकेसोबत आम्ही ठाम राहू. जर तुम्हाला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही तर तुमची भूमिका काय राहिल या प्रश्नावर मात्र काटेंनी सावध उत्तर दिलं. त्यावेळी त्या त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ असे नाना काटे म्हणाले.