राज्याच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने (Maharashtra Elections) निलेश राणे भाजपा सोडून लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत या निर्णयाबाबत महत्वाची माहिती दिली. निलेश राणे पुढे म्हणाले, मला भारतीय जनता पक्षात खूप आदर मिळाला. सगळ्या नेत्यांनी मला आदर दिला. प्रेम दिलं. पक्षातील काम करण्याची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. अडचणीतून बाहेर काढलं. मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी प्रेम दिलं.
सध्या निवडणूक जिंकायची हेच आमचं लक्ष्य आहे. बाळासाहेब हे माझं कायम दैवत. बाळासाहेबांवर प्रेम होतं आणि अजूनही आहे. शिवसेनेत मी काही मिळवायला जात नाही. हवा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी तर आजिबात चाललेलो नाही. २०१९ मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली.
माहीममधून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
मी राजकारणात नेहमीच प्रोटोकॉल आणि शिस्त पाळणारा नेता आहे. माझं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. सध्या डोक्यातही तेच आहे. मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत मी जे काही केलं ते पक्षहिताचं होतं असा मला वाटलं. स्व. बाळासाहेबांवर प्रेम तेव्हाही होतं आणि आजही आहे. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा बाळासाहेबांना कधीच विसरलो नव्हतो. बाळासाहेब कायमच आमचं दैवत राहिले आहेत आणि राहणार असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
मी काही मिळवायला आलेलो नाही. मला फक्त मतदारसंघ चांगला व्हावा असं वाटतं. माझी स्पर्धा कोणत्या आमदाराशी नाही. मी त्यांच्यावर टीका देखील करणार नाही. माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच आहे. मी या मतदारसंघाला चांगलं कसं करू शकतो इतकंच माझ्या डोक्यात आहे. मागील दहा वर्षांच्या काळात हा मतदारसंघ आपली ओळख विसरून बसला आहे ती ओळख पुन्हा निर्माण करणं हा उद्देश डोळ्यांसमोर आहे.