हरियाणात पुन्हा एकदा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कार्यभारही स्वीकारला आहे. मुख्यमंत्री म्हणून सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. (BJP) याआधी अनिल वीज आणि राव इंद्रजित यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. तशा चर्चाही होत्या. या मुद्द्यावर पक्षात गटबाजी होऊ शकते याचा अंदाज आल्याने भाजपने हरियाणाचे पर्यवेक्षक म्हणून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना नियुक्त केले होते. विधायक मंडळाच्या बैठकीतही अमित शाह आणि मोहन यादव हजर राहिले.
मुख्यमंत्री म्हणून सैनी यांना पुन्हा संधी मिळणं यात आश्चर्यकारक काही नाही. पण आता ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत त्यांच्यासाठी हा एक संदेश मात्र आहे. याआधी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतही भाजपने असा प्रयोग केला आहे. राजस्थानात वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री म्हणून निश्चित मानले जात होते. पण अगदी ऐनवेळी भाजपने राजस्थानात भजनलाल आणि मध्य प्रदेशात मोहन यादव यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली. त्यानंतर आता पक्षाने हरियाणातील हीच परंपरा कायम रखल्याचे दिसत आहे.
BJP हरियाणात कोणती आव्हाने होती
हरियाणात भाजपने नायब सिंह सैनी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत भाजपने अक्षरशः इतिहास रचला आणि सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता मिळवली. निवडणुकीत विजय मिळाला तर पुन्हा सैनीच मुख्यमंत्री होतील हे आधीच ठरले होते. असे असतानाही अंबाला कँट येथील आमदार अनिल वीज यांनी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला होता. तसेच खासदार राव इंद्रजित यांचंही नाव सीएम पदासाठी चर्चेत होतं. अशा परिस्थितीत पक्षात गटबाजी उफाळून येऊ नये अशी भीती पक्ष नेतृत्वाला वाटत होती. जर असं घडलं असतं तर शपथविधी आधीच नवा वाद सुरू झाला असता. त्यामुळे हे संभाव्य राजकीय संकट टाळण्यासाठी पक्षाने थेट अमित शाह यांनाच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलं होतं.
BJP भाजपच्या या निर्णयाचा अर्थ काय
भाजपने पुन्हा एकदा नायब सिंह सैनी यांच्या सारख्या तरुण चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळालं आहे. सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटू लागलं आहे की आपणही एक दिवस उच्च पदावर पोहोचू शकतो. आपल्या लोकप्रियतेचा गाजावाजा करून मोठं पद मिळवता येणार नाही असा स्पष्ट संदेश भाजप नेतृत्वाने नेत्यांना दिला आहे. तसेच आमदारांना आपल्या गटात ठेऊन पक्ष नेतृत्वाला दादागिरी दाखवू शकत नाही असाही मेसेज भाजप नेतृत्वाने दिला आहे.
नायब सिंह सैनी यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने हरियाणातील दिग्गज नेत्यांना पुन्हा जमिनीवर आणण्याचं काम केलं आहे. जो पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करील खुर्ची सुद्धा त्यालाच मिळेल असा संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला आहे. भाजप आजमितीस जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या पक्षात असे अनेक नेते आहेत ज्यांचं वय 70 जवळ आहे. त्यामुळे पक्षाने नव्या पिढीचा शोध सुरू केला आहे. भविष्यात पक्षाचा चेहरा ठरू शकतील असे नेते निवडण्याला पक्षाने प्राधान्य दिलं आहे.
भाजप म्हणजे बिश्नोई गँग; संजय राऊतांचा ईडी, सीबीआय’वरून भाजपवर वार
मुख्यमंत्रिपदासाठी सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाने संदेश दिला आहे की पक्षात नवीन प्रयोग सुरूच राहणार आहेत. जे शासन करण्यात कुशल असतील अशा नेत्यांना पुढे आणण्यात येईल. काही महिन्यांच्या कार्यकाळातच सैनी यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. निवडणुकीत भाजपला याचा फायदा देखील मिळाला. सरकारचा प्रमुख असा असला पाहिजे की तो पक्ष नेतृत्वाबरोबरच संघटनेतही पकड ठेऊ शकतो. कारण सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याबरोबरच संघटनाही कमकुवत होणार नाही याची काळजी त्याला घेता येईल. दरम्यान, या माध्यमातून भाजपने अन्य राज्यांनाही संदेश दिला आहे की मुख्यमंत्रि पदासाठी कुणाची मनमानी अथवा धमकी चालणार नाही. मुख्यमंत्री तोच होईल ज्याला पक्ष आणि आमदार निवडतील.
BJP मख्यमंत्रिपदावरूनच भाजप-शिवसेना युती तुटली
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुढे केल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील 25 वर्षे जुनी युती तुटली होती. मागील निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. तरी सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपवर सातत्याने दबाव आणत होते. तर मोठा पक्ष असल्याने भाजप आपला मुख्यमंत्री देण्याच्या प्रयत्नात होता. उद्धव ठाकरे काही केल्या ऐकत नव्हते त्यामुळे या वादाची परिणीती युती तुटण्यात झाली. नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री पदही मिळवले.