मुंबई / रमेश औताडे
खेळात असताना १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये विजेचा धक्का लागल्याने अनामता अहमद हिला (Mumbai News) तिचा उजवा हात गमवावा लागला होता. तब्बल दोन वर्षांनी मुंबईतील ग्लेनईगल हॉस्पिटल मध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. महिनाभरानंतर तिला घरी सोडण्यात येणार असून परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांकडून तिच्या या धाडसाचे कौतुक करण्याचा आनंदी सोहळा आयोजित केला होता.
ही शस्त्रक्रिया पशस्वीरित्या पार पाडणारे डॉ. नीलेश सतभाई (विभाग प्रमुख-प्लास्टिक, हैंड, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांटेशन) आणि त्यांच्या टीमचे अनामता ने आभार मानले.
दोन वर्षांपूर्वी, गोरेगाव, मुंबई येथील 13 वर्षीय अनामता अहमद सुट्टीसाठी उत्तर प्रदेशातील अलीगढ़ या तिच्या मूळ गावी गेली होती. तिच्या चुलत भावांसोबत खेळत असताना, तिने चुकून टेरेसवरील 11 KV तारेला स्पर्श केला, परिणामी विजेचा जोरदार धक्का बसला ज्यामुळे ती भाजली. तिच्या उजव्या हाताला गैंगरीन झाला आणि तीनदा हात कापावा लागला. तिच्या डाव्या हातालाही मोठ्या जखमा आणि गंभीर दुखापत झाली होती.
हात प्रत्यारोपण हा एकमेव योग्य उपाय असल्याचे त्यांना समजताच त्यांनी संपूर्ण भारतातील अनेक रुग्णालये आणि सिंगापूर आणि थायलंडमधील काही केंद्रांना भेट दिली. मात्र या सर्व केंद्रांवर हात प्रत्यारोपण करण्यास नकार देण्यात आला. शेवटी ते ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबई येथे आले आणि डॉ. सतभाईंचा सल्ला घेतला.
तिच्या कुटुंबीयांनी प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली असता योग्य दाता मिळण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. महिन्यापूर्वीच अनामताच्या हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अशा प्रकारचे प्रत्यारोपण मिळवणारी जागतिक स्तरावर सर्वात तरुण प्राप्तकर्ता म्हणून तिने नवा इतिहास रचला आहे.
अनामता हिला सूरत येथील 9 वर्षांच्या मेंदूमृत दात्याकडून हात मिळाला, जो आजपर्यंत देशातील सर्वात तरुण दाता आहे.
हा क्षण म्हणजे आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. कार्यक्षम हातांशिवाय जीवन अतिशय अवघड आहे. दाता आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या नवीन हाताने, मी माझे भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. हे यशस्वी प्रत्यारोपण माझ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर हे शक्य झाले असून मी डॉ. नीलेश सतभाई आणि त्यांच्या टीमची सदैव ऋणी आहे अशी प्रतिक्रिया अनामता अहमद हिने व्यक्त केली.
हात दान करणे हे आजही दुर्मिळ आहे कारण कित्येक कुटुंब यासाठी नकार देतात. परंतु दिवसेंदिवस याबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनामताची दुखापत गंभीर होती तिची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असून या शस्त्रक्रियेला जवळपास 12 तास लागले.
अंगदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी २० वर्षांहून अधिक काळ काम केल्याने, या हात प्रत्यारोपणासाठी देणगीदार कुटुंबाशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा मला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया अवयव दान प्रक्रिया अनुभव तज्ञ निलेश मांडलेवाल यांनी दिली. डॉ. बिपिन चेवले मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लेनईगल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई व इतर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.