विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.16) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांची यादी वाचली तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका रिपोर्टकार्डमध्ये मावणार नाहीत एवढी काम महायुती सरकारनं केली आहेत असं म्हणत अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सरकारच्या प्रगतीचा पाढाच वाचून दाखवला. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं विधान केलं.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. बहुतांश जागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता बोटावर मोजण्याइतक्याच जागा राहिल्या आहेत. ज्या दिवशी याचा निर्णय होईल त्यावेळी जागावाटप आणि त्याचा फॉर्म्युलाही आम्ही जाहीर करू असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis महाविकास आघाडीला कधीच यश मिळणार नाही
मला लाडक्या बहिणींना सांगायंचय या योजनेच्या विरोधात काँग्रेस नेते कोर्टात गेले आहेत. पण त्यांना यश आलं नाही. उद्धव ठाकरेंनी तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महायुती सरकारच्या योजना बंद करणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. स्थगिती सरकार आणून राज्याला कुलूपबंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे तो यशस्वी होणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. पण ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला. ह्यांनी पैसे घेऊन बदल्या गेल्या. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवले. कोरोना काळात पत्रकारांना घरातून बाहेर काढून जेलमध्ये टाकलं ते आता कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
सिंचनाच्या क्षेत्रात सरकारने अभूतपूर्व काम केलं. आधीच्या मविआ सरकारने एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नव्हती. आम्ही 145 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे 22 लाख हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध होईल. नदीजोड प्रकल्प पूर्ण केला. जवळपास 55 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणलं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त केलं. नगर नाशिक जिल्ह्यांतील पाण्याचे वाद मिटवले. सिंचनाच्या क्षेत्रात मोठं काम केल्याचे फडणवीस म्हणाले.