गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत पुन्हा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (Mumbai Fire) चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर दोन दिवसांमध्ये कुर्ला येथे मोठी आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या घटना घडून आठवडा उलटत नाही तोच आता अंधेरीतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस इमारतील बुधवारी (ता. 16 ऑक्टोबर) भीषण आग घटना घडली आहे. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. यामध्ये दोन वृद्ध आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Fire continues three die in Andheri Lokhandwala)
मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील प्रसिद्ध लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये ‘रिया पॅलेस’ ही 14 मजली रहिवाशी इमारत आहे. या इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावर आज सकाळी 08 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे इमारतीमध्ये खळबळ उडाली. नागरिकांना आगीची माहिती मिळताच धावपळ झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. पण या आगीमुळे आणि आगीच्या धुरामुळे या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहणारे चंद्रप्रकाश सोनी (वय वर्ष 74) आणि कांता सोनी (वय वर्ष 74) हे दोन वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा नोकर पेलुबेटा (वय वर्ष 42) हे तिघेजण जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले.
आज तुफान बरसणार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर आगीवर एक फायर इंजिन आणि एक जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने 50 मिनिटात नियंत्रण मिळविले आणि आग पूर्णपणे विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या आगीत वित्तीय आणि जीवितहानी झाली. या इमारतीमध्ये 10व्या मजल्यावर राहणारे सोनी दाम्पत्याच्या घरातील एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीची घटना घडली, अशी माहिती भाजपाचे माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी दिली. मात्र या दुर्दैवी घटनेबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी हे अधिक तपास करीत आहेत.