शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. नंतर नारायण राणेंना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करताय? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर राज ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आज गोरेगाव येथील नेस्कोत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, सध्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. याच वेळी नेहमी विचारावं लागतं की अमूक नेता आता कुठे आहे. प्रामाणिकपणा नावाची काही गोष्ट आहे की नाही असा सवाल करत लोक मतदान तर भरभरून करतात. पण हा नेता पक्षाचा झाला नाही तो तुमचा काय होणार असे राज ठाकरे म्हणाले. यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली.
Raj Thackeray उद्धव ठाकरे अजूनही इतिहासातच
राज ठाकरे म्हणाले, मी काल दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच यायला तयार नाहीत. इकडून अफजलखान आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राचं बोल ना. तिकडे पुष्पाचं तर वेगळंच सुरू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असे म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही.
पदाधिकारी मेळाव्यात नक्की काय म्हणाले राज ठाकरे
कुणाला निवडून दिलं. कुणी मतदान केलं. आता ते काय करत आहेत असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही. मलाच कळत नाही की नेमकं काय सुरू आहे. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. नंतर नारायण राणेंना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करताय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
Raj Thackeray अजित पवारांना थेट कॅबिनेट
अजित पवार महायुती (Ajit Pawar) सरकारमध्ये येण्याच्या आठ दिवस आधीच पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकू असे म्हटलं होतं. पण त्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी थेट कॅबिनेटमध्येच टाकलं गेलं. असं का होतंय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितांना केला. महाराष्ट्राला सरळ साधा प्रामाणिक नेता का आवडत नाही. धोका देणाराच प्रत्येक व्यक्ती तुम्हाला का पसंत आहे. आमदार फोडायचे राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढायची. नंतर विचारांशी प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत जाऊन बसायचं. हेच पाच वर्षे आपण पाहत आहोत अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.