राज्यात आता केव्हाही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तर नवीन मित्रांचाही शोध घेतला जात आहे. या घडामोडींतच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर राज ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आज गोरेगाव येथील नेस्कोत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शरद पवारांवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले, मागे मी एकदा ठाण्याच्या सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म पाळत नाहीत. त्यांच्या मुलीनेच लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत. मी या गोष्टी सांगितल्यानंतर आता शरद पवार साहेब प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागले आहेत. पण त्यांचं हे हात जोडणं देखील खोटं आहे.
फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंचा तिखट सवाल
आता निवडणुका आल्य आहेत. तेव्हा निवडणुकीत पैसे वाटले जातील. राजकीय पक्ष पैसे वाटतील. पैसे नक्की घ्या कारण ते तुमचेच आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला विजयी करा. एकदा महाराष्ट्राची कमान माझ्या हाती आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही अन् तुटणारही नाही असा विश्वास राज ठाकरेंनी उपस्थितांना दिला.
Raj Thackeray निवडणुकीनंतर मनसे सत्तेतील पक्ष असेल
आता निवडणुका जाहीर होतील. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आचारसंहिता जाहीर होतील. याकडे प्रत्येक मनसैनिकाचं लक्ष असलंच पाहिजे. कुठे काय होतंय जनतेला कशा पद्धतीने फसवलं जातंय. हे महत्वाचं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती ना आघाडी आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणारआहोत. मी तुम्हाला इतका विश्वास देऊ शकतो की निवडणुकीनंतर मनसे राज्यातील सत्तेतील पक्ष असेल असे राज ठाकरे म्हणाले.