सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशामध्ये दसऱ्यानिमित्त राज्यात 6 मेळावे (Dasara Melawa) होणार असून अनेकांचे याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीआधी कोण काय बोलणार? तसेच कोण कोणावर काय टीका करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या आरक्षणावरून राजकारण तापले आहे. अशामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जाणार आहे. तर, इकडे मुंबईत दोन दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रथा पुढे घेऊन जात उद्धव ठाकरे हेदेखील मुंबईत दसरा मेळावा घेणार आहेत. तर दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दसरा मेळावा घेऊ लागले. त्यामुळे यंदाच्या वर्षी ते दसरा मेळाव्यात काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. (Dasara Melawa Maharashtra will have 6 dasara melawa shinde thackeray manoj Jarange pankaja munde)
दसरा हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. पण यंदाचा दसरा हा खास असणार आहे, कारण आगामी विधानसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणारी आचारसंहिता यामुळे अनेक नेत्यांसाठी दसरा मेळावा ही एक मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दसऱ्याला 6 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी मुंबईत दोन दसरा मेळावा, कोल्हापुरामध्ये शाही दसरा सोहळा, नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, तसेच पाथर्डी तालुक्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा आणि बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा होणार आहे.
दोन दिवसांत मुसळधार! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Dasara Melawa मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील काही नेत्यांना घेऊन बाहेर पडले. तसेच, भाजपसोबत युती करून त्यांनी सत्तास्थापन केली. यावेळी या पक्षफूटीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आणि त्यांना ते मिळालेही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे दसरा मेळावा घेण्याची प्रथा सुरूच ठेवली. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीदेखील परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेण्याची प्रथा सुरू ठेवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगणार आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांवर काय टीका करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.
दुसरीकडे, मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. तसेच, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. तर, कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्याची महाराष्ट्रभर चर्चा असते. राजगादीचा मान असल्याने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबीयांकडून हा दसरा मेळावा साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा परंपरेनुसार होणार आहे. तत्पूर्वी नागपूरमध्ये संघ परिवाराकडून दसऱ्यादिवशी रॅली काढण्यात येते.