12.8 C
New York

Vijay Wadettiwar : राज्य सरकारकडून महिनाभरात सुमारे 165 निर्णय, काँग्रेस नेत्याचा सरकारवर निशाणा

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा असताना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून गेल्या महिनाभरात सुमारे 165 निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अशामध्ये महायुतीवर टीका केली आहे. माध्यमाशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत? आणि निर्णय घेताना खर्च किती करावा? याचा कुठलाही ताळमेळ राज्य सरकारमध्ये नाही. पैसे नसताना जीआर काढले गेले आहेत, फक्त टक्केवारी मोजण्यासाठी हे सर्व राज्य सरकार घेत आहे,” अशी टीका त्यांनी केली. (Vijay Wadettiwar criticized Mahayuti Government taking cabinet decisions)

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत सुमारे 40 निर्णय गुरुवारी (ता. 10 ऑक्टोबर)घेण्यात आले. तसेच, 23 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत 22 निर्णय घेण्यात आले होते. 30 सप्टेंबरला आणि 4 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत त्यानंतर तब्बल 47 निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “हे लोकं जाता जाता महाराष्ट्राला कंगाल करून सोडणार आहेत. जेवढे मिळेल तेवढे लुटण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.” असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.

Vijay Wadettiwar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार बाहेर पडल्याची चर्चा

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशामध्ये गुरुवारी (ता. 10 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान अजित पवार हे 10 मिनिटात बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने सध्या लावलेल्या योजनांच्या धडाक्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा रुळावरुन घसरू शकतो, याची जाणीव अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना आहे. त्यामुळेच ते अर्थखात्याच्या कारभाराला शिस्त लावण्याचे प्रयत्न करत आहेत. कदाचित या कारणामुळे महायुतीच्या नेत्यांना अजित पवार नकोसे झाले असावेत.” असे विधान त्यांनी केले. तसेच, महायुतीच्या नेत्यांनी अजित पवार यांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरु केले असावेत, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला. “महायुती सरकारमध्ये वाद हे नेहमीचेच आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत वाद होत असतात. पण हे वाद महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी होतात.” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img