17 C
New York

Eknath Shinde : पुण्यातील मतदारसंघावर शिवसेनेचा दावा पक्का..

Published:

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने पुणे शहरातील सर्व मतदारसंघांवरील दावा सोडला अशा बातम्या काही वृत्तवाहिन्यांत आल्या आहेत. परंतु असे काही नाही. आम्ही मागील अनेक दिवसांपासून आम्ही मागणी करत आहोत की येथील आठ पैकी किमान तीन जागा शिवेसेनेला मिळाव्यात. हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या तीन जागांचा यात समावेश आहे. या जागांची मागणी आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे केली असून या मतदारसंघावर आमचा दावा कायम राहिल. महायुतीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहिल मात्र या तीन मतदारसंघावर आमचा दावा राहिल असे शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी स्पष्ट केले.

भानगिरे यांनी या वृत्तावर स्पष्टीकरण देत पुणे शहरातील मतदारसंघांवरील दावा शिंदे गटाने सोडल्याचा मुद्दा खोडून काढला. त्यांच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे की शिंदे गट जागावाटपात शहरातील तीन मतदारसंघाची मागणी करील.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली (Maharashtra Elections) आहे. निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यातच पुणे शहरातील (Pune News) एकाही मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना उमेदवार देणार नाही अशी बातमी समोर आली होती. त्यामुळे पुणे शहरातील मतदारसंघांवरील दावा शिवसेनेने सोडल्याची चर्चा सुरू झाली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले महायुतीच्या जागा वाटपाचे गणित

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही. पुणे शहरातील एका सुद्धा जागेवर शिवसेनेची लढाईची तयारी नाही असे सांगितले गेले होते. परंतु, शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी या बातम्यात काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील २ जागांवर शिवसेना आग्रही आहे. पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे गटाकडून पुण्यातील मतदारसंघात उमेदवार दिले जातील असे यावरून दिसत आहे. त्यामुळे आता पुणे शहरातील जागांसाठी अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट या तिन्ही पक्षांत चर्चा होतील. दुसरीकडे भाजपात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. विद्यमान आमदारांनाच तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी अन्य इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img