हरियाणाच्या निवडणूक निकालात आज मोठा उलटफेर दिसून येत आहे. (Vinesh Phogat) मतदानानंतरच्या सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हरियाणा जिंकणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सगळेच एक्झिट पोल उद्धवस्त करत भाजपने मोठी मुसंडी मारली. सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणात भाजप ५० जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला फक्त ३५ जागा मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या विनेश फोगाटच्या निवडणुकीचा निकालही आता हाती आला आहे. एकवेळ तर अशी आली होती की जुलाना मतदारसंघात विनेश दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. पंरतु, नंतर आघाडी घेत विनेश फोगाटने विजय मिळवला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीआधी मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याबरोबर बजरंग पुनिया देखील काँग्रेसमध्ये सहभागी झाला होता. यानंतर काँग्रेसने विनेश फोगाटला जुलाना मतदारसंघातून तिकीट दिले होते. विनेश फोगाट विरुद्ध भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. या हायहोल्टेज लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. विनेश फोगाट यांच्यासाठी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता.
हरियाणात भाजप हॅटट्रिक करणार ?
त्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली होती. यामध्ये विनेश फोगाटही आघाडीवर होती. परंतु,नंतर विनेश फोगाट पिछाडीवर पडून थेट चौथ्या क्रमांकावर राहिली. विनेश फोगाट दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. त्यामुळे विनेश फोगाट जिंकणार की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.