मंगळवारी (ता. 08 ऑक्टोबर) सकाळपासून हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा (Haryana Assembly Election) निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हरियाणात सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 10 वर्षानंतर सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. पण तासाभरानंतर काँग्रेस पिछाडीवर आली अन् भाजपाने हॅटट्रिकच्या दिशेने वाटचाल सुरू केली. तर दुसरीकडे एनसी-काँग्रेस काश्मीरात 370 कलम हटविल्यानंतर सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार पाहायला मिळत आहे.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून या राज्यांच्या संदर्भातील सर्वेक्षण अहवाल समोर आले आहेत. त्यानुसार हरियाणात सत्तांतराची लाट असल्याने येथे भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी असल्याचे म्हटले गेले. त्यानुसार, मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच हरियाणात काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. पोस्टल मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने मुसंडी मारत बहुमताच्या आकड्याच्यावर म्हणजे 45 जागांच्यावर मुसंडी मारली. पण त्यांना आघाडी केवळ तासभर कायम ठेवता आली. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने त्यानंतर भाजपाने अचानकपणे आघाडी घेत वाटचाल सुरू केली. त्यामुळे हरियाणात भाजपाचेच वादळ पाहायला मिळत आहे.
हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य
तर, जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. जम्मू आणि कश्मीर कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. या राज्यात भाजपाने महत्त्वाचे निर्णय घेऊनही येथील जनतेने भाजपाला नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी फारुक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हाच पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आताच्या कलांनुसार या राज्यात काँग्रेस आणि एनसी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सने मिळून बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेस फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण या ठिकाणचे काही फुटिरतावादी पक्ष आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी या सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे बोलले जात आहे.