14.8 C
New York

Supriya Sule : बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…

Published:

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित पवार यांनीच निर्माण केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याचीही माहिती समोर आलेली नाही. अशातच आता या मतदारसंघातील उमेदवारीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या पक्षाने बारामतीतून कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही त्यावर बोलणार नाही. मात्र आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहे आणि फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. आपल्या भारतात टॅलेंटला कमी नाही संपूर्ण भारतात टॅलेंट आहे, कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये असा टोला त्यांनी लगावला.

एमआयएमने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकारणात आहे. याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, एआयएमआयएमकडून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव आला असेल तर मला त्याची माहिती नाही. आमच्या वरिष्ठांकडे तो प्रस्ताव आला की नाही याबाबत पक्षाचे वरिष्ठच सांगू शकतील असे उत्तर त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेब बोलले ते खरं आहे. संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न आम्हीच विचारले आहेत. आरक्षणासंदर्भात आम्हीच सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. मराठा आरक्षण विषय हा केंद्राशी निगडीत आहे. त्यामुळे कुठलंही सरकार असलं त्यांनी मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule नाराजांना समजावून सांगणार

हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार गटात प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केले. हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते.

हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी. मात्र हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे आणि जे नाराज आहेत त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img