नवनीत बऱ्हाटे
प्रचंड पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदेचा दफनविधी
शिंदे गट आणि भाजपाचा विरोध निष्फळ
उल्हासनगर
उल्हासनगरात तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) दफनविधीला शिंदे गट, भाजपा आणि स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला. बदलापूर शहरातील क्रूर अत्याचार प्रकरणातील या आरोपीचा अंत्यविधी उल्हासनगर शहरात होऊ नये, यासाठी नागरिकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभुमीत दफनासाठी खणलेल्या खड्ड्यात पुन्हा माती टाकली. मात्र पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात राजकीय नेत्यांचा विरोध मोडून काढत हा अंत्यविधी अखेर शांततेत पार पडला, मात्र नागरिकांचा संताप अजूनही शमलेला नसल्याचे चित्र यावेळी पाहवयास मिळाले.
बदलापुर शहरातील दोन निष्पाप चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीवर प्रशासनाला उल्हासनगरात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. शिंदे गटाचे नेते राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, कपील अडसूळ आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन हा दफनविधी उल्हासनगरात होऊ नये, यासाठी तीव्र विरोध दर्शविला. शेकडो नागरिकांनी स्मशानभूमीत एकत्रित येऊन घोषणाबाजी केली, तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खणलेल्या दफनाभुमीच्या खड्ड्यात पुन्हा माती टाकून हा दफनविधी थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उल्हासनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा दफनविधी अखेर तणावपूर्ण वातावरणात पार पडला.
हायकोर्टाच्या आदेशानंतर उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत अक्षय शिंदेचा दफनविधी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या भावनांचा आदर राखत शिंदे गटाने या निर्णयाला तीव्र विरोध केला. “अक्षय शिंदेने केलेल्या कृत्यांमुळे शहरातील जनतेच्या भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा अंत्यविधी उल्हासनगरात होणे हे अस्वीकारार्ह आहे,” असे स्पष्टपणे सांगत शिंदे गटाच्या नेत्यांनी हा दफनविधी रोखण्याचा प्रयत्न केला.
शेकडो नागरिकांनी स्मशानभुमीत हजेरी लावत अक्षय शिंदेला दफन करण्यास विरोध दर्शविला. नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. “अशा क्रूर व्यक्तीला आमच्या शहरात जागा नाही,” असे आवाज उठवत त्यांनी हा अंत्यविधी उल्हासनगरात होऊ नये, अशी मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अखेर पोलिसांनी राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे, प्रदीप रामचंदानी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या विरोधामुळे स्मशानभुमीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तणाव वाढत असताना प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. शेकडो नागरिकांच्या जमावामुळे प्रकरण आणखी गंभीर होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांनी स्मशानभुमीला घेरले. प्रशासनाच्या कडक उपाययोजनांमुळे आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दफनासाठी खणलेल्या खड्ड्यात पुन्हा माती टाकली असली तरी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा खड्डा खोदून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
दफनविधी दरम्यान पोलिसांनी शिस्तबद्धपणे परिस्थिती हाताळली आणि मोठ्या विरोधानंतरही प्रशासनाने हा विधी शांततेत पार पाडला. विरोधाच्या पार्श्वभूमीवरही हायकोर्टाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर कॅम्प ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत दफन करण्यात आला. प्रशासनाने हा विधी शांततेत पार पाडण्याच्या प्रयत्नात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली.
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीमुळे उल्हासनगरात तणावाचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांचा विरोध प्रचंड होता, परंतु पोलिस आणि प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामुळे हा दफनविधी अखेर पूर्ण करण्यात आला. नागरिकांचा संताप अजूनही कायम असून, या प्रकरणाने शहरात अस्वस्थतेचे वातावरण आहे. शिंदे गट, भाजपा आणि नागरिकांचा विरोध हा केवळ या अंत्यविधीपर्यंत मर्यादित नसून, या प्रकरणामुळे शहरात एक नवा वाद उद्भवला आहे. प्रशासनाने विधी पार पाडला असला तरी स्थानिकांचा विरोध अजूनही कायम असून, या प्रकरणावर पुढील काळात काय प्रतिक्रिया उमटतील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.