सिनेट निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या युवसेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर अखेर 10 जागांचा निकाल समोर आला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या विजयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी तर बॅलेट पेपरवरून बोलत सत्ताधाऱ्यांच्या सिनेटमधील पराभवाचे खरे कारण सांगितले आहे. सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे शिंदे सरकारला काहीच करता आले नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut criticized Mahayuti after winning Senate Election 2024)
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 28 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी भाजपाने, शिंदे गटाने गेली दोन वर्ष निवडणूक रखडवण्याचा, निवडणूक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपद्व्याप केले. दोन वर्षांत निवडणूक घेणे टाळण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. शेवटी हायकोर्टाने दणका दिल्यावर सिनेटच्या निवडणुका झाल्या आणि काल (शुक्रवार, 27 सप्टेंबर) निकाल लागला. 10 पैकी 10 जागा जिंकून मुंबईचा तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर वर्ग हा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे दिसून आले.
महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा
तसेच, याआधी पदवीधर मतदारसंघातही शिवसेनेचा विजय झाला, आता सिनेट निवडणुकांमध्येही युवासेनेला विजय मिळाला. 10 पैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मते मिळवली. तर शेवटच्या 10व्या उमेदवाराला 865 मते मिळाली. पण भाजपाच्या अभाविपच्या सर्व उमेदवारांना मिळून फक्त 706 मते मिळाली आहेत. पण आमच्या शेवटच्या उमेदवारालाही त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. मुंबई विद्यापीठावर आता भगवा फडकला आहे. अभाविप असो किंवा शिंदे गट असेल, त्यांना प्रयत्न करूनही ही निवडणूक टाळता आली नाही किंवा जिंकता आलेली नाही. कारण येथील मत विकत घेता येत नाहीत आणि या निवडणुकीतील मतदारही विकला जात नाही. त्यामुळे शिंदेंना काहीच करता आले नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.