आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरल्याचं सांंगितलंय. नवरात्र उत्सवाच्या आधीच जागावाटप पार पडणार असल्याचं जयंत पाटलांकडून सांगण्यात आलंय. अहमदनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या दोन्ही घटकांशी बोललेला आहे. त्यामुळे सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ असे आम्ही या अगोदर म्हटले असल्याचं जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय.
महायुतीला अजित पवारांशिवाय पर्याय नाही, जयंत पाटलांचा खोचक टोला
तसेच आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज मराठा आरक्षणाचे काही पदाधिकारी आपल्याला येऊन भेटले व त्यांनी त्यांचे म्हणणे आम्हाला सांगितले आहे. जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा खालवली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये व ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार या दोन्ही घटकांशी बोललेला आहे. त्यांच्याबरोबर बैठकही घेतलेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारने काय निर्णय घेतलेला आहे हे आम्हाला माहित नाही पण जो काही सारखा निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असे आम्ही या अगोदरच जाहीर केले असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. यावर माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर भेट घेणं म्हणजे पक्षात येणं असं नाही ते कशासाठी भेटले हे आपल्याला माहीत नाही असंही पाटील म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार या संदर्भात विचारले असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की त्यांच्या प्रवेश प्रक्रिये बाबत आपल्याला काहीही कल्पना नाही आपण निश्चितपणे माहिती घेऊ असे ते म्हणाले. रोहित पवार यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये अन्य कार्यक्रम आहेत व त्यांना यापुढे मोठा कार्यक्रम असल्यामुळे ते आजच्या या सभेला उपस्थित राहिलेले नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.