राज्यात काल मान्सूनच्या परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ (Heavy Rain) घातला. मुंबईत तर काल रात्री धो धो पाऊस कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची हजेरी कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होती. पावसाचा मुक्काम आजही कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.
काल मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. फास्टट्रॅकवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. तर विक्रोळी ते भांडुप परिसरात ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. आजही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुण्यातील शाळा (Pune Rains) आणि महाविद्यालयांना त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा आज बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज या जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी
पुण्यात काल जोरदार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. काल दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. नागरी वस्तीत पाणी जमा झाले होते. पुण्याच्या जवळील पिंपरी चिंचवड शहरालाही पावसाने झोडपून काढले. आजही या दोन्ही शहरात पावसाचा मुक्काम राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. या शक्यता पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील एसपी कॉलेजच्या मैदानावर नियोजित सभा होणार आहे. मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळे गरज वाटल्यास कदाचित सभेचे ठिकाण बदलले जाऊ शकते.