पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मागील दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येणार होते. त्यामुळे महायुतीसाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर परशूराम महाविद्यालय मैदानावर होणार होता.
कोणत्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता होऊ शकते. अवघ्या 2 महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून राष्ट्रीय नेतृत्वांचेही महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जेपी नड्डा असोत, काही दिवसांत ते महाराष्ट्रात येऊन गेले आहेत.
परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. मोदींची विशाल सभा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. मात्र,कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी; आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
Narendra Modi पावसाचा धडाका
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला. गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे.
Narendra Modi भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये पूर्वनियोजित दौरा होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. शहरातील विविध भागांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे पोस्टर आणि बॅनर्स झळकत होते. त्याचबरोबर नव्याने तयार करण्यात आलेली मेट्रो स्टेशन देखील सजली होती. स्वारगेट, मंडई आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनला फुलांनी सजवण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा पदाधिकारी आणि इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावर आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.