डोक्यावर गांधी टोपी, पांढरा सदरा-पायजमा आणि पायात साधीशी चप्पल. दिंडोरीपासून जपानपर्यंत नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) याच पेहरावात दिसतात. पण त्यांचं दिसणं जेवढं साधं आहे तेवढंच राजकारण बेरकी आहे. “शरद पवारसाहेब हे माझं दैवत आहेत, माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील”, असे नरहरी झिरवळ 2019 च्या विधानसभा निकालानंतर म्हंटले होते. त्याच झिरवळांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ दिली. पण लोकसभेचा प्रचार सुरू असताना झिरवळ एकदा थेट महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले होते. याची दिंडोरी मतदारसंघात बरीच चर्चा झाली.
दिंडोरीचा निकाल लागताच झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्टेजवर दिसले. त्यानंतर त्यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांचीही भेट घेतली. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचेही बोलले गेले. त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होणार का? असे बोलले जाऊ लागले. पण झिरवळ सांगत राहिले की गोकुळ माझा मुलगा आहे, तो माझ्या ऐकण्याच्या बाहेर नाही. तर नरहरी झिरवळ यांनीही शरद पवार यांच्यासोबत यावे अशी साद गोकुळ यांनी घातली.
या सगळ्या घडामोडी बघून ऐनवेळी झिरवळ कोणता पवित्रा घेतील, याचा नेम नसल्याने या अजित पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी कुठलीही उसंत घेतली नाही. मित्रपक्षांशी चर्चाही केली नाही. महायुतीत जागावाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये सांगितले होते. पण, दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावरून झिरवळ यांचे अजित पवार यांना वाटत असलेले महत्त्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित होतात. अशात आता झिरवळ यांनी मीच गोकुळला जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी पाठवले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज बांधता येईना. (In Dindori Assembly Constituency, Narahari Jhirwal of NCP will fight against Gokul Jhirwal of Sharad Chandra Pawar’s NC
दिंडोरी मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास कायमच काँग्रेस विचारांना मानणारा मतदारसंघ राहिला आहे. जनता पक्षाकडून हरीभाऊ महाले यांचा 1980 आणि 1985 हे निवडून आले होते. त्यानंतर 1995 साली किसनराव चारोस्कर हे काँग्रेसकडून निवडून आले. पण निकालापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा रामदास चारोस्कर निवडून आले. त्यानंतर 1999 साली रामदास चारोस्कर यांनी शरद पवार यांची साथ दिली. ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले. 2004 मध्ये मात्र कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी तळागाळातून आलेल्या नरहरी झिरवळ यांच्यामागे ताकद उभी केली. झिरवळांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले आणि ते पहिल्यांदा आमदार झाले.
पुणे पोलिसांचा घाम फोडणारा ‘हा’ आदेश नेमका काय?
Narhari Zirwal भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?
2009 मध्ये राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी झिरवळ यांना संधी देण्यात आली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभेलाही झिरवळ यांना अवघ्या 148 मतांनी पराभवाचा धक्का बसला. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शिवसेनेच्या धनराज महाले यांच्या मागे ताकद उभी केली. त्यामुळे झिरवळ यांना पराभवाचा धक्का बसल्याचे मानले गेले. 2014 मध्ये या पराभवाचा वचपा काढत झिरवळ यांनी विधानसभा गाठली. 2019 मध्ये झिरवळ निवडून आले पण तो विजय त्यांचा लक्षात राहण्यासारखा होता. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. त्यावेळी ते अजितदादांसोबतच होते.
नंतर झिरवळ विमानाने थेट हरियाणाला पोहोचलेले आणि गुरुग्राममधील हॉटेलमध्ये पहाऱ्यात अडकले. तिथून अगदी नाट्यमयरित्या ते बाहेर पडले. तिथून ते विधानसभेचे उपाध्यक्षही झाले. अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड केल्यानंतरही झिरवळ यांनी त्यांची साथ दिली. आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. पण मुलाच्या हालचालींनी त्यांची चिंता वाढवली आहे. मुलगा गोकुळ यांचा कल शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र, राजकारणात काय घडेल हे सांगता येत नाही. झिरवळ मुलास पुढे करून वेगळे डावपेच खेळत असल्याचा शरद पवार यांच्या गटाला संशय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून अद्यापही गोकुळ झिरवळ यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. लोकसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक 82 हजार 308 मतांची आघाडी मिळाली होती. खासदार भास्कर भगरे यांना मिळालेली एक लाख 38 हजार मते झिरवळ यांंची चिंता वाढविणारी ठरली आहेत.
याशिवाय या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात तापी खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि माजी आमदार रामदास चारोस्कर, त्यांची पत्नी सुनीता चारोस्कर, संतोष रेहरे, अशोक बागूल, यांचा समावेश आहे. महायुतीत परस्पर उमेदवारी जाहीर करण्यावरून कलहाची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी आमदार धनराज महाले यांना रिंगणात उतरविण्याचे त्यांच्या पक्ष प्रवेशावेळीच सूचित केले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले “थांबतील, की बंडखोरी करतील, हा प्रश्नच आहे.