नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर
अंबरनाथ शहरातले एक थरारक आणि चित्तथरारक अपहरण प्रकरण (Crime) पोलिसांनी केवळ १२ तासांत उघडकीस आणले आहे. २० वर्षीय तरुणाचे अपहरण करून ४० कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या गुन्हेगारांच्या सर्व योजना उल्हासनगर परिमंडळ ४ च्या पोलिसांच्या कुशल तपासासमोर उधळल्या गेल्या. अचूक तांत्रिक तपास आणि धाडसी कारवाईमुळे या गुन्ह्यातील १० आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या, तर अपहृत तरुणाची सुरक्षित सुटका करण्यात आली. या चमकदार कामगिरीने संपूर्ण शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
अंबरनाथ शहरात २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या थरारक अपहरणाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. बांधकाम व्यावसायिक संजय रंभाजी शेळके यांचा २० वर्षीय मुलगा चार्मस ग्लोबल सिटी, अंबरनाथ पूर्व येथे स्विफ्ट गाडीतून प्रवास करत असताना, अपहरणकर्त्यांनी आपल्या एर्टिगा गाडीतून पाठलाग करून त्याचे अपहरण केले होते. हा घटनाक्रम अत्यंत धाडसी पद्धतीने फिल्मी स्टाईलने करण्यात आला होता. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या मोबाईलवरून वडील संजय शेळके यांना फोन करून थेट ४० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. संजय शेळके यांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अपहरणानंतर संजय शेळके यांना वारंवार फोन करून आरोपींकडून खंडणीची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला ४० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी, परिस्थिती ओळखून खंडणीची रक्कम कमी करत शेवटी २ कोटी रुपयांवर आणली. त्यांनी ही रक्कम ओला कारमध्ये ठेवून, कार क्रमांक पाठवण्यास सांगितले. परिस्थिती गंभीर बनत चालली होती, मात्र उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलली.
पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी ८ विशेष तपास पथके तयार करून घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील ४५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासा दरम्यान पोलिसांना अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या एर्टिगा गाडीचा क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या मोबाईल नंबरचा तपास करून आरोपींचा माग काढण्यात आला.
अपहरणकर्त्यांनी खंडणी देण्यासाठी ठरवलेल्या ओला कारवर पोलिसांनी गुप्तपणे पाळत ठेवली. आरोपींनी वारंवार ठिकाण बदलत ओला कारला विविध ठिकाणी थांबण्याचे सांगितले होते, ज्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. परंतु पोलीसांनी धैर्य आणि संयम राखून ओला कारचा गुप्तपणे पाठलाग सुरूच ठेवला. काही वेळानंतर आरोपींना आपल्या आजूबाजूला पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी संजय शेळके यांना फोन करून मुलगा २० ते २५ मिनिटांत घरी पोहोचेल असे सांगून फोन बंद केला.
पोलीसांनी तांत्रिक तपास करत अपहरणकर्त्यांच्या मोबाईल कॉलची लोकेशन ट्रेस केली. लोकेशन पिसे डॅम, वासेरेगाव, आणि पडघा, भिवंडी परिसरात मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ तेथे शोधमोहीम राबवली. पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून शोध घेतला असता, पिसे डॅमच्या जवळ अपहृत तरुण आढळून आला. पोलिसांनी त्याची सुरक्षित सुटका करून त्याला वडील संजय शेळके यांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे शेळके कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे सिम विक्रेता निखील लाबना याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विनेश राजू अडवाणी या मुख्य आरोपीसह अन्य १० आरोपींचा तपास लागला. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ KIA CARENS कार, गावठी पिस्तूल, ३ काडतुसे, एअर पिस्तूल, एक धारदार लोखंडी सुरा, लाल नायलॉन दोरी, काळे मास्क आणि ५ मोबाईल फोन असा एकूण १२.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आरोपी देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार यांनी मुंबई महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून विविध जिल्ह्यांतील उमेदवारांची फसवणूक केली होती. त्यांनी प्रत्येकी ८ ते १० लाख रुपये घेतले होते, मात्र ते पैसे परत करण्यासाठीच त्यांनी अपहरणाचा कट रचला होता. पोलिसांनी या संपूर्ण घटनेत अत्यंत कुशल आणि धाडसी पद्धतीने कामगिरी करत १२ तासांच्या आत गुन्ह्याचा तपास लावला आणि अपहरणकर्त्यांना पकडून तरुणाची सुरक्षित सुटका केली.