मुंबई / रमेश औताडे
राज्य परिवहन महामंडळाकडे असलेल्या १५०० हेक्टर “लँड बँकेचा” विकास करणार व लाल परीला ST Bus व महामंडळाला चांगले दिवस आणणार असा विश्वास एस टी महामंडळाचे २४ वे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला तेव्हा आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
एसटीच्या जमिनीचा विकास करण्यासाठी भाडेकरार ३० वर्षांवरून ६० वर्षापर्यंत हा राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णय चांगला आहे. भाडेकराराची मुदत ३० वर्षे ही अत्यंत कमी असल्यामुळे, या योजनेला गेल्या २०-२२ वर्षांमध्ये म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. या काळात केवळ ४८ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन “बांधा वापरा व हस्तांतरित करा” या योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त करून, एसटीच्या जास्तीत जास्त जागा भाडेतत्त्वावर देऊन त्यातून चांगला निधी उभारणे महामंडळाच्या विचाराधीन होते.त्याची अंमलबजावणी आता धडाक्यात करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
१०० पेक्षा जास्त प्रकल्प विकसित करण्याचा आराखडा महामंडळ स्तरावर आखला जात असनू, लवकरच यापैकी २० व्यवहार्य प्रकल्पाची निविदा निघणार आहे. भविष्यात एसटीला तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच ” बांधा वापरा व हस्तांतरित करा” करा या योजनेतून शेकडो कोटी रुपयाचा निधी एसटीला प्राप्त होणार आहे. तसेच महामंडळाच्या सध्याच्या आस्थापना (बसस्थानक, आगार व कार्यालय) ही नव्याने बांधून मिळणार आहेत. त्यामुळे एसटीला भविष्यात चांगले दिवस येतील.प्रवाशांना चांगल्या बसेस, विकसित बसस्थानके आणि स्वच्छ व सुंदर प्रसाधन गृहे देण्याचा माझा प्रयत्न राहील असे गोगावले यांनी यावेळी सांगितले.