सीरीया आणि लेबनॉन मंगळवारी कम्युनिकेशन पेजरच्या स्फोटाने हादरले. (Lebanon Pager Blast) या स्फोटात दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या सदस्यांसह ९ लोक ठार झाले. तर किमान २,८०० लोक जखमी झाले आहेत. (Blast) मृतांमध्ये ८ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात होता, असं वृत्त सीएनएनने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
हिजबुल्लाहने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा इस्रायलला दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेत संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लेबनीज सरकारने या हल्ल्याचा ‘गुन्हेगारी इस्रायली कृत्य’ अशा शब्दांत निषेध नोंदवला आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने मंगळवारी झालेल्या स्फोटाच्या पाच महिने आधीच लेबनॉनचा दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या ५ हजार तैवान निर्मित पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके पेरली होती, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये वरिष्ठ लेबनीज सुरक्षा सुत्रांच्या हवाला देत करण्यात आला आहे.
Lebanon Pager Blast पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा एकाचवेळी स्फोट
इराण समर्थक दहशतवादी गट हिजबुल्लाहचे हजारो सदस्य वापरत असलेले पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा मंगळवारी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये एकाच वेळी स्फोट झाला. यात किमान ९ लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. सीरियामध्ये जवळपास १०० स्फोट झाले आहेत.
Lebanon Pager Blast पेजर्सना कोडेड मेसेज पाठवल्यानंतर स्फोट
पेजर्सना कोडेड मेसेज आल्यानंतर स्फोट झाला, असा आरोप लेबनीज सुरक्षा सुत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. ‘मोसादने डिव्हाइसमध्ये एक बोर्ड बसविला, ज्यामध्ये स्फोटक सामग्री असून त्याला एक कोड प्राप्त होतो. ते शोधणे खूप कठीण आहे. कोणत्याही डिव्हाइस किंवा स्कॅनरदेखील ते शोधता येत नाही, असं वृत्त रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
Lebanon Pager Blast गोल्ड अपोलोकडून किती पेजर्स मागवले?
हिजबुल्लाहने तैवान येथील गोल्ड अपोलो या कंपनीकडून ५ हजार पेजर्स मागवले होते. एप्रिल ते मे दरम्यान त्याची देशात तस्करी करण्यात आली होती. AP924 व्हेरिएंट असे स्फोट झालेल्या पेजरचे मॉडेल आहे. स्फोटाने नुकसान झालेल्या पेजर काही फोटो समोर आले आहेत. त्यात मागील बाजूस गोल्ड अपोलोने तयार केलेल्या पेजर सारखे स्टिकर्स आणि डिझाइनदेखील दिसून आले आहे.
Lebanon Pager Blast पेजर्सवर एक मेसेज आला
स्काय न्यूज अरेबियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने डिव्हायसेसच्या बॅटरीवर PETN ही अत्यंत स्फोटक वस्तू ठेवली होती. परिणामी बॅटरीचे तापमान वाढल्याने त्यांचा स्फोट झाला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेजरचा मॉडेल क्रमांक AP924 असा होता. प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ एक ते दोन स्फोटक जोडली होती. लेबनॉनमध्ये दुपारी साडेतीन वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. त्यानंतर पेजरमध्ये बसवलेली स्फोटक सक्रिय झाली, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पेजरमधील स्फोटापूर्वी त्यात काही सेकंदांपर्यंत बीपचा आवाज आला आणि त्याचा स्फोट झाला, असे सांगण्यात आले आहे.
Lebanon Pager Blastमोठा प्लॅन
क्वचितच कोणी विचार केला असेल की पेजर, सुमारे 100 ग्रॅम वजनाच्या कम्युनिकेशन डिव्हाइसद्वारे एखाद्याला मारलं जाऊ शकतं. वास्तविक, इस्त्रायली पाळत ठेवू नये म्हणून लेबनीज दहशतवादी गटाने पेजरचा अवलंब केला होता. इस्रायलने जवळपास एक वर्षापासून आपल्या कमांडर विरुद्ध हल्ले वाढवल्यामुळे हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहने आपल्या कार्यकर्त्यांना स्मार्टफोन वापरणं बंद करण्याचं जाहीरपणं आवाहन केलं. पण ज्या पेजरच्या वापराचा ते सल्ला देत होता तेच लोकांच्या मृत्यूचं कारण बनणार हे त्यांना कसं कळलं हा मोठा प्रश्न आहे.